भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी आपला सराव सुरू केला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोशल मीडियावर टीम इंडियाच्या पहिल्या सराव सत्राचा व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये सर्व खेळाडू मैदानात घाम गाळताना दिसत आहेत. ”आमचे पहिले संघ सराव सत्र सुरू झाले आहे आणि यादरम्यान अधिक उत्सुकता आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी टीम इंडियाची तयारी जोरात सुरू आहे”, असे बीसीसीआयने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगितले.

साऊथप्म्टनचे मैदान, ड्यूक्स चेंडू, त्यानंतर टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंचा सराव, याचे दर्शन या व्हिडिओमध्ये घडवण्यात आले आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा हे तिघेही फलंदाजीचा सराव करताना दिसत आहेत. त्यानंतर जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी हे वेगवान गोलंदाजही या व्हिडिओत गोलंदाजीचा मारा करताना दिसले. प्रशिक्षक रवी शास्त्री यांची नजर या सर्वांवर होती.

हेही वाचा – दुर्दैवच अजून काय! दुखापतीमुळे केन विल्यमसन गमावणार पहिला नंबर

 

टीम इंडियाचा दिग्गज फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनही या व्हिडिओत दिसून आला. त्यानंतर युवा फलंदाज ऋषभ फलंदाजीदरम्यान हाणामारी करताना दिसला. सराव सत्रात टीम इंडियाने करोनासंबंधित सर्व नियम व मार्गदर्शक सूचना पाळल्या आहेत. प्रशिक्षण सत्रात विराट कोहली व अन्य खेळाडूदेखील मास्क घालताना दिसले.

हेही वाचा – नवऱ्याच्या संघातील क्रिकेटपटूचा ‘गजनी’ लूक पाहून साक्षी धोनी झाली ‘इम्प्रेस’!

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १८ जूनपासून खेळला जाणार आहे. टीम इंडियाने सराव सुरू केला आहे, दुसरीकडे कीवी संघ १० इंग्लंडविरुद्ध दुसरा कसोटी सामना खेळणार आहे.