भारतविरुद्ध इंग्लंडदरम्यानच्या दुसऱ्या टी-२० सामन्यामध्ये पदार्पणातच अर्धशतक झळकावत भारताला विजय मिळवून देणाऱ्या इशान किशनवर कौतुकाचा वर्षाव सुरु आहे. इशानने मालिकेतील दुसऱ्या सामन्यात केलेल्या दमदार खेळीनंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी इशानच्या वडिलांना फोन केला होता. नितीश यांनी इशानच्या वडिलांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे अभिनंदन केलं. बिहार सरकारमधील मंत्री असणाऱ्या संजय झा यांनी इशानचे वडील प्रणव पांडेय यांची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन केलं. पहिल्याच टी-२० सामन्यामध्ये भन्नाट कामगिरी करणाऱ्या इशानचं कौतुक झा यांनी केलं आणि पुढील वाटचालीसाठी इशान आणि त्याच्या वडिलांना शुभेच्छा दिल्याचे न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

नक्की पाहा फोटो >> खेळी एक विक्रम अनेक… विराटने ७३ धावांच्या खेळीत मोडले ‘हे’ तीन विश्वविक्रम

आयपीएलमधून आपल्या कामगिरीची छाप पाडल्यानंतर भारतीय संघामध्ये दणक्यात एन्ट्री घेणारा इशान हा मूळचा बिहारचा आहे. आपल्या शानदार कामगिरीच्या जोरावर त्याने केवळ सामनाच जिंकवला नाही तर सामानावीर हा पुरस्कारही पटकावला. इशानच्या खेळीमुळेच भारताला पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये १-१ अशी बरोबर करता आली.

इशानची कामगिरी पाहून त्याच्या घरच्यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. इशानच्या कामगिरीमुळे त्याच्या घरच्यांसोबतच त्याला ओळखणाऱ्या प्रत्येकाला त्याचा अभिमान वाटत आहे. इशानने आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यामध्ये ३२ चेंडूमध्ये ५ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ५६ धावांची खेळी केली.  हा सामना संपल्यानंतर इशानला सामानावीर पुरस्कार घोषित झाल्यावर त्याच्या बिहारमधील घरी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. अनेकांनी इशानच्या पालकांची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन केलं. रात्री उशीरापर्यंत इशानच्या घरी शुभेच्छा देण्यासाठी लोकं येत होती. इशानचे आई वडील पाटण्यामध्ये राहतात. ते इशानच्या कामगिरीवर खूपच सामाधानी आहेत.

आयपीएल गाजवलेल्या सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांनी दुसर्‍या टी-२० सामन्यात पदार्पण कले. या सामन्यात सूर्यकुमारला फलंदाजीची संधी मिळाली नाही. पण, ‘छोटा पॉकेट बडा धमाका’ म्हणून ओळख असलेल्या इशानने इंग्लंडच्या स्टार गोलंदाजांची धुलाई केली. त्यामुळे या दोघांनाही तिसऱ्या सामन्यात संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. आज सायांकाळी सात वाजता अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये या मालिकेतील तिसरा सामना रंगणार आहे.