२०१२ मध्ये उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणाच्या आरोपातून मुक्त झाल्यानंतर अमित पांघलने बॉक्सिंग रिंगणात भल्याभल्या प्रतिस्पध्र्याना धूळ चारत आंतरराष्ट्रीय स्तरावर घवघवीत यश संपादन केले; पण या आरोपांमुळे अर्जुन पुरस्कारासाठी कायम डावलले गेलेल्या अमितने आता राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांच्या निकषांमध्ये बदल करण्याची मागणी केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांच्याकडे केली आहे. सध्याची निवड प्रक्रिया पक्षपाती असल्याचा आरोप अमितने केला आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या अमितने गेल्या वर्षी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत देशाला पहिले रौप्यपदक मिळवून दिले होते. अमितने क्रीडामंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘‘पुरस्कारासाठी स्वत:हून शिफारस पाठवण्यासाठी खेळाडूंना आपली बाजू मांडण्याची आवश्यकता नाही. सध्याच्या निवड प्रक्रियेत खेळाडूला स्वत:ला अर्ज करावा लागत असून निवड समिती या अर्जाद्वारे पुरस्कारासाठी खेळाडूंची शिफारस करत असते. खेळाविषयी कोणतेही देणेघेणे नसलेल्या क्रीडा समिती सदस्यांच्या भेदभावपूर्ण निर्णयांद्वारे पुरस्कारासाठी निवड केली जात आहे.’’

अमित पांघलची दोन वेळा अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली होती; पण आधीच्या उत्तेजकांच्या आरोपांमुळे त्याला डावलण्यात आले आहे. २०१२ मध्ये कांजण्यांवर उपचार करताना अमित उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळला होता. यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

‘‘क्रीडा मंत्रालय आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण (साइ) यांच्याकडे माझ्याबाबतची सर्व माहिती उपलब्ध आहे. पुरस्कारासाठी कोण योग्य आहे, हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. या वर्षी बदल करता आले नाहीत तर किमान पुढील वर्षी तरी निवड प्रक्रियेच्या निकषांमध्ये बदल होणे गरजेचे आहे,’’ असेही त्याने सांगितले.

‘‘भारतीय सैन्यदल माझ्या पुरस्कारासाठी प्रयत्न करत असून उत्तेजकांचे आरोप यंदा आड येणार नाहीत, अशी आशा आहे,’’ असे अमित पांघल म्हणाला.