आव्हान टिकवण्याकरता दिल्लीसाठी प्रत्येक सामना निर्णायक

कोलकाता नाइट रायडर्सवर दणदणीत विजय मिळवून पुण्यात दाखल झालेल्या कर्णधार श्रेयस अय्यरच्या दिल्ली डेअरडेव्हिल्स संघापुढे इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) सोमवारी होणाऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाचे कडवे आव्हान उभे ठाकले आहे.

गुणतक्त्यात अव्वल स्थानी असणाऱ्या चेन्नईला मागील लढतीत मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभूत व्हावे लागले. मात्र, एका पराभवाने खचणारा चेन्नईचा संघ नाही, हे दिल्लीला सुद्धा ठाऊक आहे. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत अग्रस्थानी असणारा अंबाती रायडू, सुरेश रैना, शेन वॉटसन आणि स्वत: कर्णधार महेंद्रसिंग धोनी जबरदस्त फॉर्मात आहेत. शिवाय गोलंदाजीत ड्वेन ब्राव्हो, शार्दूल ठाकूर, इम्रान ताहिर असे खमके पर्याय चेन्नईकडे उपलब्ध आहेत.  चेन्नईसाठी प्रभावी कामगिरी करणारा वेगवान गोलंदाज दीपक चहर गुडघ्याच्या दुखापतीमुळे पुढील काही सामने मुकणार आहे.

दुसरीकडे गौतम गंभीरच्या कर्णधारपदाच्या राजीनाम्यामुळे श्रेयसच्या नेतृत्वाखाली दिल्लीने धडाक्यात सुरुवात करत स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवले आहे. श्रेयससह भारताला १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकवून देणाऱ्या संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ याच्यावर सर्वाच्या नजरा खिळल्या आहेत. दोन सामन्यात त्याने अनुक्रमे २२, ६२ अशा एकूण ८४ धावा काढल्या आहेत. यांच्याशिवाय ऋषभ पंत, कॉलिन मन्रो, ग्लेन मॅक्सवेल असे धडाकेबाज फलंदाज दिल्लीकडे आहेत. गोलंदाजीत आवेश खान व लियम प्लंकेट समर्थपणे जबाबदारी पार पाडत आहेत. दुखापतीमुळे ख्रिस मॉरिस संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे दक्षिण आफ्रिकेचाच वेगवान गोलंदाज ज्युनियर डाला याला संघात स्थान मिळते का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

  • सामन्याची वेळ : रात्री ८ वा.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्सवर.