आंतरराष्ट्रीय पातळीवरील अव्वल दर्जाच्या कामगिरीची दखल नाही

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सन्मानापेक्षा कोणत्याही खेळाडूस त्याच्या घरच्यांकडून झालेल्या कौतुकाचे बोल अनमोल असतात, अशा कौतुकाचा वर्षांव होण्यासाठी प्रत्येक जण आसुसलेला असतो. परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवर अव्वल दर्जाची कामगिरी करूनही जेव्हा आपल्याच शहरात त्या कामगिरीची फारशी कोणी दखल घेत नसेल, तेव्हा त्याची सल कोणाही ‘बुद्धि’वानास अधिकच जाणवते. विश्वनाथन आनंदनंतर बुद्धिबळमध्ये भारताची विश्वविजेतेपदाची आशा असलेल्या सुपर ग्रँडमास्टर विदित गुजराथीच्या संदर्भात नेमके तेच होत आहे. नाशिककरांना अद्याप विदितची कामगिरी कळलीच नाही की काय, इतपत तो बेदखल झाला आहे.

अलीकडेच नेदरलँडमध्ये झालेल्या टाटा स्टील आंतरराष्ट्रीय चॅलेंजर मालिकेचे विजेतेपद मिळविणारा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त विदित गुजराथी सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर बुद्धिबळमध्ये ३०व्या क्रमांकावर आहे. चॅलेंजर स्पर्धेतील विजेतेपदामुळे पुढील वर्षी होणाऱ्या टाटा स्टील मास्टर्स स्पर्धेसाठी तो पात्र ठरला आहे. या स्पर्धेसाठी पात्र ठरणे हेच मुळात मोठे आव्हानात्मक. आता या स्पर्धेत विश्वविजेता मॅग्नस कार्लसन, विश्वनाथन आनंद, फॅबिआनो कारुआना यांसारख्या दिग्गजांविरुद्ध विदितच्या बुद्धीचा कस लागणार आहे.  आईल ऑफ मॅन स्पर्धेत कार्लसनविरुद्ध खेळताना विदितने त्यास आपल्याविरुद्धचा डाव बरोबरीत सोडविणे भाग पाडले होते. ही मोठीच कामगिरी म्हणावी लागेल. विदितच्या या कामगिरीचा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक क्रीडापटूंनी, संस्थांनी गौरव केला असला तरी त्याच्या स्वत:च्या शहरात म्हणजे नाशिकमध्ये मात्र असे भाग्य वाटय़ाला आलेले नाही.

देश तसेच देशाबाहेर आपल्या शहराचे नाव गाजविणाऱ्या कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तीच्या कामगिरीची सर्वप्रथम दखल घेणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. दुर्दैवाने राजकीय खेळात माहीर असलेल्या महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधक दोघांचाही वकूब त्याबाबतीत कमी पडत आहे. काही वर्षांच्या कालखंडानंतर जिम्नॅस्टिकच्या रूपाने पुन्हा एकदा महापौर चषक क्रीडा स्पर्धाचा श्रीगणेशा यंदा झाला असला तरी त्याचा शहरातील खेळाडूंना किती आणि महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना किती फायदा झाला, याचा हिशेब मांडल्यास बरेच काही कळून येईल. खरे तर नाशिक ही गुणवंतांची खाण आहे. या खाणीतील अनमोल हिऱ्यांच्या प्रकाशाचा झोत आपल्याकडे वळविण्याचे कष्ट महापालिकेने घेतल्यास तो पालिकेचाच गौरव ठरणार आहे. क्रीडा क्षेत्रात तर असे अनेक हिरे नाशिककडे उपलब्ध आहेत. धावपटू कविता राऊतनंतर दत्तू भोकनळ, मोनिका आथरे, संजीवनी जाधव यांची कामगिरी सातासमुद्रापार पोहचली असताना पालिकेला त्याचा गंधही नाही.

विदितची कामगिरी तर विलक्षणच म्हणावी लागेल. त्याचा खेळही वेगळा. संयमाची आणि चातुर्याची परीक्षा पाहणारा. तनापेक्षा मनाचा व्यायाम घडवून आणणारा. अनेकांच्या बुद्धीपलीकडील हा खेळ असल्याने त्याचे महत्त्व अधिकच. चॅलेंजर स्पर्धेच्या विजेतेपदानंतर पुण्यात लक्ष फाऊंडेशनतर्फे ५१ हजार रुपयांचे पारितोषिक देऊन त्याच्या कामगिरीचा गौरव करण्यात आला. हे असे काम नाशिकमध्ये होण्याची अधिक गरज होती. एरवी आपल्या वाढदिवशी कौतुक सोहळ्यात न्हाऊन निघण्यासाठी शहरभर हजारो रुपये खर्च करून फलकबाजी करणाऱ्यांची नाशिकमध्ये कमतरता नाही. त्यापैकी काही खर्च अशा खेळाडूंवर केला तर त्या मंडळींचे आपोआपच कौतुक होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

बुद्धिबळमध्ये विदित गुजराथी एकेक पायरी पुढेच जात आहे. विदितच्या यशाची मुंबई, पुण्याच्या संस्था, संघटनांनी दखल घेतली, परंतु नाशिककरांनी विशेष दखल घेतलेली नाही. सध्या विदितचे यलो मानांकन २७२५ आहे. २५०० यलो मानांकनापर्यंत अनेक जण जातात, परंतु त्यानंतर पुढे जाणे अवघड असते. कोणीही असो, त्याच्या पाठीवर त्याच्या शहरातून शाबासकीची थाप मिळाल्यास त्याचा हुरूप अधिक वाढतो. नाशिकमध्ये कविता राऊत, संजीवनी जाधव, दत्तू भोकनळ यांसारखे अनेक गुणवंत खेळाडू आहेत. ऑलिम्पिकसाठी एखाद्या खेळाडूची निवड होणे हाही मोठा गौरव आहे. तो ऑलिम्पिकमध्ये कशी कामगिरी करतो, ही गोष्ट नंतरची, परंतु निवड होताच त्याला प्रोत्साहन दिले तर त्याच्या कामगिरीत अनुकूल फरक दिसू शकतो.

 -डॉ. संतोष आणि डॉ. निकिता गुजराथी (विदितचे पालक)