विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचं २०१९ विश्वचषक स्पर्धेतलं आव्हान अखेरीस संपुष्टात आलं आहे. न्यूझीलंडच्या संघाने भारतावर १८ धावांनी मात करत अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चीत केलं. भारतीय संघाच्या या पराभवानंतर साहजिकपणे, पराभवाची कारणं शोधण्याचा प्रयत्न केला जातोय. बीसीसीआयनेही भारतीय संघाच्या कामगिरीची दखल घेतली असून, प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांच्यासोबत क्रिकेट प्रशासकीय समितीचे अधिकारी बैठक घेणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उपांत्य फेरीतील पराभवानंतर टीम इंडियात दोन गट पडले आहेत.

भारतीय संघातील एका खेळाडूने नाव न घेण्याच्या अटीवर वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघ सध्या दोन गटांमध्ये विभागला गेला आहे. ‘Times Now’ या इंग्रजी संकेतस्थळाने यासंदर्भातलं वृत्त दिलेलं आहे. पहिला गट हा कर्णधार विराट कोहलीचा गट असून दुसरा गट हा उप-कर्णधार रोहित शर्माचा गट आहे. कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री हे कधीकधी एकमेकांशी चर्चा न करता थेट निर्णय घेतात, ज्यामुळे संघात गोंधळाचं वातावरण निर्माण होतं. विश्वचषकाचा संघ जाहीर होण्यापूर्वी अंबाती रायुडूऐवजी विजय शंकरला संघात स्थान देण्यावरुनही असाच गोंधळ निर्माण झाल्याचं खेळाडूने स्पष्ट केलं आहे.

क्रिकेट प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांचा कर्णधार विराट कोहलीला पाठींबा आहे. याच कारणामुळे प्रक्षिक्षक अनिल कुंबळे यांच्याशी झालेला वाद, आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत पराभव होऊनही विराटवर कारवाई करण्यात आली नव्हती. खेळाडूने नाव न घेण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, विराटच्या गटातील खेळाडूंना भारतीय संघात जागा मिळते. लोकेश राहुलची कामगिरी कितीही खराब असली तरीही त्याचा सलामीवीर, चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी नेहमी विचार केला जातो. नाहीतर किमान १५ जणांच्या संघात तरी राहुल आपलं स्थान टिकवतोच. आयपीएलमध्ये एकाच संघात खेळत असल्यामुळे युजवेंद्र चहल सध्या भारतीय संघात असल्याचा आरोप खेळाडूने केला आहे.

अंबाती रायुडूला भारतीय संघात जागा न मिळण्यामागेही संघ व्यवस्थापनाचा हात असल्याचा आरोप या खेळाडूने केला आहे. याचसोबत टीम इंडियातले काही खेळाडू हे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांच्या कामगिरीवर खुश नसल्याचंही कळतंय. विश्वचषकानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होणार आहे. त्यामुळे या प्रकरणात आता नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.