सनराईजर्स हैदराबाद संघाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने आयपीएलच्या बाराव्या हंगामात आपली चांगली कामगिरी सुरुच ठेवली आहे. मंगळवारी, चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध सामन्यात वॉर्नरने ५७ धावांची अर्धशतकी खेळी केली. सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करत असताना, जॉनी बेअरस्टो स्वस्तात माघारी परतल्यानंतर वॉर्नरने मनिष पांडेच्या साथीने संघाचा डाव सावरला. वॉर्नरने ५७ धावांची खेळी केली, ज्यात ३ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. या दरम्यान वॉर्नरने रोहित-शिखर आणि विराट कोहलीच्या अनोख्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

चेन्नईविरुद्ध आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतकी खेळी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत वॉर्नरने स्थान मिळवलं आहे. शिखर धवन, रोहित शर्मा आणि विराट कोहली या तिन्ही फलंदाजांनी चेन्नईविरुद्ध ६ वेळा अर्धशतकी खेळी केली आहे. याचसोबत सातत्याने अर्धशतकी खेळी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत वॉर्नरने विरेंद्र सेहवाग आणि जोस बटलरशी बरोबरी केली आहे. बाराव्या हंगामात वॉर्नरने सलग ५ वेळा अर्धशतकं झळकावली आहेत.

गेल्या पाच सामन्यांमध्ये वॉर्नरची कामगिरी पुढीलप्रमाणे –

५७ – विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज
६७ – विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स
५० – विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज
५१ – विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स<br />७०* – विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब

चेन्नई सुपरकिंग्जचा अपवाद वगळता डेव्हिड वॉर्नरने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धही अशीच सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे.

दरम्यान, मनिष पांडे आणि डेव्हिड वॉर्नरने केलेल्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर सनराईजर्स हैदराबाद संघाने १७५ धावांपर्यंत मजल मारली. केन विल्यमसनच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या हैदराबादने चेन्नईच्या गोलंदाजांचा व्यवस्थित समाचार घेतला. हैदराबादकडून डेव्हिड वॉर्नरने ५७ तर मनिष पांडेने नाबाद ८३ धावा केल्या. चेन्नईकडून हरभजन सिंहने २ तर दिपक चहरने १ बळी घेतला.