टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत आयपीएलच्या या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करेल. आयपीएलच्या शेवटच्या सत्रात पंत काही खास कामगिरी करू शकला नही. मात्र, गेल्या तीन महिन्यांत पंतने टीम इंडियाकडून दमदार कामगिरीचे प्रदर्शन केले. त्यामुळे तो हाच फॉर्म आगामी आयपीएलमध्येही तसाच ठेवेल, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे. पंतची बॅट चालली, तर तो अनेक खास विक्रम तो आपल्या नावावर करू शकतो.
- आयपीएलमध्ये पंतने आतापर्यंत 2079 धावा केल्या आहेत. त्यामुळे तो अनेक दिग्गज फलंदाजांना मागे टाकू शकतो. राहुल द्रविडने आयपीएलमध्ये 2174धावा केल्या आहेत, तर सचिनने आयपीएल कारकीर्दीत 2334 धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त आफ्रिकेचा माजी अष्टपैलू जॅक कॅलिसने आयपीएलमध्ये 2427 धावा केल्या आहेत. आता पंत या महान फलंदाजांना मागे टाकू शकतो.
- टी-20 क्रिकेटमध्ये 25 चौकार ठोकताच पंतच्या नावावर 300 चौकारांचा विक्रम होईल.
- ऋषभ पंत आयपीएलमध्ये 200 चौकार पूर्ण करण्यापासून 17 चौकार दूर आहे. आयपीएलच्या इतिहासात दिल्ली संघाकडून 200 चौकार ठोकणारा पंत दुसरा खेळाडू ठरेल. पंतव्यतिरिक्त सेहवागने 266 चौकार ठोकले आहेत.
- आयपीएलमध्ये 4 झेल घेताच तो या स्पर्धेत 50 झेल घेणारा खेळाडू ठरेल. यष्टीरक्षक म्हणून पंत 50 झेल घेण्यापासून 7 झेल दूर आहे. अशी कामगिरी केल्यानंतर पंत दिल्ली संघाकडून 50 झेल घेणारा पहिला यष्टीरक्षक ठरेल.
- आयपीएलमध्ये जसप्रीत बुमराह हा एकमेव गोलंदाज आहे, ज्याने आयपीएलमध्ये पंतला 5 वेळा बाद केले आहे.
श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाल्यानंतर यंदाच्या आयपीएलसाठी दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी पंतकडे सोपवण्यात आली. दिल्लीने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत घोषणा केली. “दिल्लीतच मी वाढलो आणि मोठा झालो. सहा वर्षांपूर्वी दिल्लीतूनच माझ्या आयपीएल करिअरला सुरुवात झाली. एक दिवस दिल्लीचे नेतृत्व करावे, हे स्वप्न मी आजपर्यंत पाहात आलो आहे. आणि आज ते स्वप्न सत्यात उतरले आहे. मी त्यासाठी खूप आनंदी आहे”, अशी प्रतिक्रिया ऋषभ पंतने दिली.