भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाच्या कसोटी मालिकेत ०-२ असा पराभव झालेला असला तरी त्यांना कमी लेखण्याची चूक कुणीही करू नये, कारण आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ सर्वात आश्वासक वाटत असल्याचे मत ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज माइक हसीने व्यक्त केले आहे.
‘‘ गेले दोन महिने भारताचा संघ ऑस्ट्रेलियामध्ये आहे, त्यामुळे त्यांनी वातावरणाशी चांगलेच जुळवून घेतले आहे. त्याचबरोबर तिरंगी एकदिवसीय मालिकाही काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे विश्वचषकाच्या दृष्टीने ते चांगल्या स्थितीत असतील. त्यामुळे त्यांना आगामी विश्वचषकासाठी कमी लेखता कामा नये,’’ असे हसी म्हणाला.
तो पुढे म्हणाला की, ‘‘भारताला कसोटी मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले, पण कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट यांच्यामध्ये नक्कीच तफावत असते. भारताने कसोटी मालिका गमावलेली असली तरी त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. विराट कोहलीने या मालिकेत दमदार फलंदाजी केली, तर त्याचा हाच फॉर्म कायम राहिला तर नक्कीच प्रतिस्पध्र्यासाठी भारताला सामोरे जाणे सोपे नसेल.’’
भारताच्या गोलंदाजांवर सध्या चहूबांजूनी टीका होत असली तरी हसीला मात्र सध्याची गोलंदाजी २०११ च्या विश्वचषकापेक्षा चांगली वाटते आहे. याबद्दल तो म्हणाला की, ‘‘भारताची सध्याची गोलंदाजी ही २०११ च्या विश्वचषकापेक्षा चांगली आहे. हे विधान धाडसी वाटत असेलही, पण या संघातील गोलंदाजांमध्ये चांगली गुणवत्ता आहे. पण चांगला गोलंदाज असणे आणि चांगली गोलंदाजी असणे यामध्ये तफावत आहे. कसोटी मालिकेमध्ये या गोलंदाजांनी वाईट कामगिरी केली, त्यांच्या गोलंदाजीमध्ये शिस्त नव्हती. पण मला विश्वास आहे की, या अनुभवावरून ते बरेच काही शिकले असतील आणि याचा फायदा त्यांना नक्कीच आगामी विश्वचषकात होऊ शकेल.’’