ENG vs WI 1st Test : करोनाच्या तडाख्यानंतर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पाचव्या दिवशी वेस्ट इंडिजने इंग्लंडवर ४ गडी राखून विजय मिळवला. २०० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चौथ्या डावात जेरमाइन ब्लॅकवूडने दमदार ९५ धावांची खेळी केली आणि संघाला ३ सामन्यांच्या मालिकेत १-० ची आघाडी मिळवून दिली. पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात ५ बळी टिपणाऱ्या गॅब्रियलला सामनावीराचा किताब मिळाला.
शेवटच्या दिवशी २०० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने झटपट तीन गडी गमावले. तसेच जॉन कॅम्पबेल एका धावेवर खेळत असताना रिटायर्ड होत तंबूत परतला. पण त्यानंतर रॉस्टन चेस आणि जेरमाईन ब्लॅकवूड या दोघांनी दमदार खेळी केली. त्यांनी ७३ धावांची भागीदारी केली. ब्लॅकवूड ९५ धावांवर बाद झाल्यावर कर्णधार होल्डरने विजयाची औपचारिकता पूर्ण केली. याच विजयासोबत वेस्ट इंडिजने २१ व्या शतकात म्हणजेच २००० ते २०२० या कालावधीत दुसऱ्यांदा इंग्लंडमध्ये खेळताना २०० धावांचे आव्हान शेवटच्या डावात पार केले. असा पराक्रम करणारा वेस्ट इंडिज हा एकमेव पाहुणा संघ ठरला आहे.
Stat Alert
West Indies is the only away team to chase a target of 200+ twice in England in this century#WIReady #ENGvWI #MenInMaroon pic.twitter.com/yCkqfao244
— Windies Cricket (@windiescricket) July 12, 2020
दरम्यान, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांनी पहिल्या डावात २०४ धावा केल्या. तर प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा पहिला डाव ३१८ धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे वेस्ट इंडिजकडे पहिल्या डावाअखेरीस शतकी आघाडी होती. त्यानंतर इंग्लडंच्या दुसऱ्या डावात सिबलीने (५०) अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर क्राव्हलीने डाव सांभाळत स्टोक्सला साथ दिली आणि ९८ धावांची भागीदारी केली. क्राव्हलीने ७६ तर स्टोक्सने ४६ धावा केल्या. पण इतर फलंदाज झटपट बाद झाले. त्यामुळे इंग्लंडला ३१३ धावाच करता आल्या.