भारत-इंग्लंड कसोटी मालिका

अहमदाबाद येथेच होणारी चौथी कसोटी वेगळ्या खेळपट्टीवर खेळवण्यात येणार असली तरी, त्यावर फिरकीपटूंचेच वर्चस्व दिसून येईल, असे मत भारताचा अनुभवी सलामीवीर रोहित शर्माने व्यक्त केले आहे. त्याशिवाय फलंदाजांनी खेळपट्टी अथवा फिरकीपटूंचे भय न बाळगता नैसर्गिक खेळ केल्यास आपोआप धावा होतील, असेही रोहितने सांगितले.

भारत-इंग्लंड यांच्यात मोटेराच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या प्रकाशझोतातील तिसऱ्या कसोटीत भारताने इंग्लंडचा १० गडी राखून धुव्वा उडवत चार सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. परंतु अवघ्या दोन दिवसांतच कसोटी संपल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये मोटेराच्या खेळपट्टीविषयी वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. मात्र रोहितने खेळपट्टीला दोष देण्यापेक्षा फलंदाजांनी अधिक बचावात्मक पवित्रा अवलंबल्यामुळे कसोटीचा निकाल लवकर लागल्याचे नमूद केले.

‘‘फिरकीपटूंसाठी पोषक खेळपट्टीवर जेव्हा तुम्ही फलंदाजी करता, त्या वेळी फक्त एकामागून एक चेंडू निर्धाव खेळून काहीच अर्थ नसतो. मोटेराची खेळपट्टी चेपॉकच्या खेळपट्टीपेक्षा फार वेगळी होती. परंतु इंग्लंडप्रमाणेच भारतीय फलंदाजांनीसुद्धा काहीसा अतिबचावात्मक खेळ केला. मी स्वत: दोन्ही डावांदरम्यान कशा रीतीने अधिकाधिक धावा जमवता येतील, याचा विचार केला. त्यामुळेच पहिल्या डावात किमान अर्धशतक झळकावू शकलो,’’ असे ३३ वर्षीय रोहित म्हणाला. उभय संघांतील चौथी कसोटी ४ मार्चपासून मोटेरालाच खेळवण्यात येणार आहे.

‘‘चौथी कसोटी मोटेरा स्टेडियममधील वेगळ्या खेळपट्टीवर खेळवण्यात येणार असली तरी तिथेही फिरकीपटूंचेच वर्चस्व राहण्याची सर्वाधिक शक्यता आहे. त्यामुळे फलंदाजांनी सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्यासह नैसर्गिक खेळ करणे आवश्यक आहे,’’ असे रोहितने सांगितले. त्याशिवाय रोहितने सामनावीर अक्षर पटेल तसेच ४०० बळी घेणारा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि १००वी कसोटी खेळणाऱ्या इशांत शर्माचे खास कौतुक केले.

खेळाडूंनी नव्हे, ‘आयसीसी’ने खेळपट्टीचे परीक्षण करावे -रूट

तिसऱ्या सामन्यासाठी वापरण्यात आलेली मोटेराची खेळपट्टी कसोटी क्रिकेटसाठी योग्य आहे की नाही, हे ठरवण्याचा अधिकार खेळाडूंना नसून फक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला आहे, असे स्पष्ट मत इंग्लंडचा कर्णधार जो रूटने व्यक्त केले. ‘‘मोटेराची खेळपट्टी फलंदाजीसाठी खरेच आव्हानात्मक होती. आम्ही खराब फलंदाजी केली, हे मान्य आहे. मात्र माझ्यासारख्या कामचलाऊ गोलंदाजाने पाच बळी मिळवणे, हेच या खेळपट्टीविषयी बरेच काही सांगून जाते. तरीही खेळाडूंनी या खेळपट्टीचे आकलन करण्यापेक्षा ‘आयसीसी’नेच ही खेळपट्टी खेळण्यालायक आहे की नाही, हे ठरवावे,’’ असे रूट म्हणाला.