भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने पुन्हा एकदा संघातला अनुभवी खेळाडू आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीला आपला पाठींबा दर्शवला आहे. ३० मे रोजी इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी नुकतीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या संघात धोनीवरच भारतीय संघाच्या यष्टीरक्षणाची जबाबदारी टाकण्यात आलेली आहे.

India Today वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विराट कोहलीने धोनीला आपला पाठींबा दर्शवला आहे. “मी भारतीय संघात आल्यानंतर धोनीकडे दुसऱ्या पर्यायांचा विचार करण्याची संधी होती. मात्र धोनीने त्याकाळात मला पाठींबा देत मला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी दिली. कोणत्याही तरुण खेळाडूला इतक्या लवकर तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळत नाही.” कोहलीने जुन्या आठवणींना उजाळा दिला.

अवश्य वाचा – IPL 2019 : RCB च्या सहकाऱ्यांसाठी विराट-अनुष्काची डिनर पार्टी

“क्षेत्ररक्षण असो किंवा गोलंदाजीमधले बदल; धोनीला सर्व गोष्टींचा व्यवस्थित अंदाज येतो. याच कारणासाठी माझा कर्णधार म्हणून धोनीवर विश्वास आहे. पहिल्या चेंडूपासून अखेरच्या चेंडूवर काय होणार आहे हे धोनीला माहित असतं. त्यामुळे धोनीसारख्या खेळाडूचं संघात असणं माझ्यासाठी फायदेशीरच आहे.” विराटने धोनीची स्तुती केली. अनेकदा लोकं धोनीवर टीका करतात, पण माझ्यासाठी त्याची खेळावरची निष्ठा महत्वाची असल्याचं विराट म्हणाला. ५ जून रोजी भारत विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.

विश्वचषकासाठी असा असेल भारतीय संघ –

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन,लोकेश राहुल, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, विजय शंकर, केदार जाधव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, दिनेश कार्तिक (राखीव यष्टीरक्षक), जसप्रित बुमराह, रवींद्र जाडेजा