पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीला करोनाचा संसर्ग झाला आहे. आफ्रिदीनेच यासंदर्भातील माहिती दिल्याचे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. आफ्रिदीनेही यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे.

“मला गुरुवारपासून बरं वाटतं नव्हतं. अंगदुखीचा प्रचंड त्रास होत होता. मी त्यानंतर करोना चाचणी केली आणि दुर्देवाने चाचणीचा निकाल पॉझिटीव्ह आला आहे. माझ्या प्रकृतीमध्ये तात्काळ सुधारणा होण्यासाठी तुम्ही सर्वांना प्रार्थना करा,” असं आफ्रिदीने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

मागील काही काळापासून ट्विटवरुन केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आफ्रिदी कायमच चर्चेत असतो. मागील काही दिवसांमध्ये त्याने कधी काश्मीर प्रश्नावरुन तर कधी करोनासंदर्भात मोदींवर टीका केल्याचे पहायला मिळालं आहे. वयाच्या ३६ व्या वर्षी २१ वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीनंतर २०१७ साली फेब्रुवारी महिन्यामध्ये आफ्रिदीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला.  २०१४ मध्ये त्याने शाहिद आफ्रिदी फाऊंडेशन या सामाजिक संस्थेची निर्मिती केली. देशातील नागरिकांचे आरोग्य आणि शिक्षण पुरवण्याचे कार्य ही संस्था करते. ‘युनिसेफ’प्रमाणेच अनेक जागतिक संस्थांच्या पोलिओ उपक्रमात आफ्रिदीचा सहभाग आहे. स्वभावातील बिनधास्तपणा मैदानावरसुद्धा उत्कटपणे दाखवणाऱ्या शाहिदी हा पाकिस्तानमध्ये आजही तितकाच लोकप्रिय आहे.

पाकिस्तानमध्ये करोनाचे एक लाख ३२ हजारहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर आतापर्यंत तेथे अडीच हजारहून अधिक जणांना करोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. ५० हजार पाकिस्तानी नागरिक करोनामधून पूर्णपणे बरे झाले आहेत.