एकापेक्षा दिग्गज खेळाडूंना सुरुवातीच्या काही दिवसांतच बाहेर पडावे लागल्यामुळे आता विम्बल्डन स्पर्धेत क्रमवारीतील खालच्या क्रमांकावरील खेळाडूंमध्ये आगेकूच करण्यासाठी जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. जर्मनीचा १३वा मानांकित टॉमी हास आणि फ्रान्सचा २८वा मानांकित जेरेमी चार्डी यांनी विम्बल्डन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीतील सामने जिंकून विजयी घोडदौड कायम राखली आहे.
टॉमी हासने जिमी वँगचे आव्हान ६-३, ६-२, ७-५ असे सहज परतवून लावले. पुरुषांमध्ये जेरेमी चार्डीने जर्मनीच्या जॅन-लेनार्ड स्ट्रफ याला ६-२, ५-७, ७-६ (८/६), ७-६ (७/५) असे पराभूत केले. युक्रेनच्या अलेक्झांडर डोल्गोपोलोव्ह याने कोलंबियाच्या सान्तियागो गिराल्डोचा ६-४, ७-५, ६-३ असा धुव्वा उडवला. स्लोव्हाकियाच्या ग्रेगा झेमल्जा याला बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोव्हवर विजय मिळवण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागले. पाच सेटपर्यंत रंगलेल्या या चुरशीच्या सामन्यात झेमल्जाने ३-६, ७-६ (७/४), ३-६, ६-४, ११-९ असा विजय मिळवला.
रॉजर फेडररला पराभवाची धूळ चारणाऱ्या सर्जी स्टॅखोव्हस्की याचे आव्हान दुसऱ्या फेरीतच संपुष्टात आले. ऑस्ट्रियाच्या जर्गन मेल्झरने त्याच्यावर ६-२, २-६, ७-५, ६-३ असा विजय साकारला. महिलांमध्ये, जर्मनीच्या लॉरा रॉबसन हिने कोलंबियाच्या मारियाना डेक्यू-मारिनो हिच्यावर ६-४, ६-१ अशी सहज मात केली.

पेस-स्टेपानेक दुसऱ्या फेरीत
लंडन : लिएण्डर पेस आणि त्याचा सहकारी राडेक स्टेपानेक यांना पुरुष दुहेरीच्या सलामीच्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी बराच घाम गाळावा लागला. पेस-स्टेपानेक जोडीने डॅनियल ब्राकायली आणि जोनाथन एल्रिच यांना ७-६ (६), ६-४, ६-७ (४), ६-४ असे पराभूत केले. त्यांना पुढील फेरीत जेमी डेल्गाडो आणि मॅथ्यू एबडेन या जोडीचा सामना करावा लागेल. महेश भूपती आणि त्याची स्लोव्हाकियाची सहकारी डॅनिएला हन्तुचोव्हा यांना मिश्र दुहेरीच्या पहिल्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. त्यांना मार्क नोल्स-सबिन लिसिकी यांनी ७-६ (२), ४-६, ४-६ असे हरवले.