भारतीय संघाची सध्या मायदेशात आफ्रिकेविरूद्ध कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेत भारतीय फलंदाजांनी आपली चमक दाखवून दिली. पण एका खेळाडूला मात्र या मालिकेच्या सुरूवातीआधीच मालिकेतून माघार घ्यावी लागली होती. पाठीच्या दुखण्यामुळे त्याला या मालिकेला मुकावे लागले होते. तो खेळाडू म्हणजे भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या. हार्दिक याच्या पाठीवर लंडनमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. शनिवारी या बाबतची माहिती देण्यात आली.

हार्दिक गेले काही दिवस पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त होता. त्यामुळे त्याला काही मालिकांनादेखील मुकावे लागले होते. तसेच सध्या सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी मालिकेतदेखील त्याला विश्रांती देण्यात आली आहे. त्या दरम्यान हार्दिकच्या पाठीवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे आता हार्दिक पांड्या लवकरच संघात कमबॅक करणार आहे.

हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या टी २० मालिकेत मोहाली आणि बंगळुरू येथील सामने खेळला, पण त्यानंतर मात्र तो शस्त्रक्रियेसाठी लंडनला रवाना झाला. सध्या तरी केवळ शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु नक्की किती दिवसात हार्दिक पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर परतेल ते मात्र सांगण्यात आलेले नाही.

हार्दिकला पाठीच्या दुखण्याचा त्रास बऱ्याच काळापासून होत आहे. पण त्याने विश्वचषक स्पर्धेत दमदार पुनरागमन केले होते. त्यानंतर आफ्रिकेविरूद्धच्या टी २० मालिकेत त्याच्या पाठीच्या दुखण्याने उचल खाल्ली. त्यामुळे त्याला कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली. त्यानंतर मात्र त्याला थेट शस्त्रक्रिया करून घेण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यानुसार शनिवारी त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.