पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या चिंतेत वाढ होताना दिसत आहे. दुखापतीमुळे आधीच डेविड वॉर्नरनं पहिल्या कसोटी सामन्यातून माघर घेतली असताना आणखी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा युवा सलामिवीर फलंदाज विल पुकोवस्की पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर गेला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं आपल्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतची माहिती दिली आहे.

विल पुकोवस्कीच्या जागी आता मार्कस हॅरिसला संघात स्थान देण्यात आलं आहे. पहिल्या सराव सामन्यात विल पुकोवस्कीच्या हेल्मेटवर कार्तिक त्यागीचा बाऊंसर आदळला होता. त्यानंतर विल पुकोवस्कीला कनकशनचा त्रास झाला. त्यामुळे रिटायर्ट हर्ट होऊन पुकोवस्की सामना अर्ध्यावर सोडून गेला होता. कनकशन जास्त प्रमाणात होत असल्यामुळे पहिल्या सामन्याला विल पुकोवस्की मुकणार आहे.

पाहा कार्तिक त्यागीचा बाऊन्सर –


सिडनी येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात डेविड वॉर्नर जखमी झाला होता. त्यामुळे तो उर्वरीत सामन्याला मुकला होता. शिवाय टी-२० मालिका आणि पहिल्या कसोटीतून त्याला आराम देण्यात आला. वॉर्नरच्या जागी सलामीला पहिली पसंती विल पुकोवस्कीला देण्यात आली होती. मात्र, आता तोही जखमी झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या चिंतेत वाढ झाली आहे. बॉक्सिंग डे कसोटी सामन्यासाठी डेविड वॉर्नर उपलब्ध असणार आहे.

आणखी वाचा – रहाणेची खिलाडूवृत्ती! जखमी खेळाडूच्या चौकशीसाठी गेला ऑस्ट्रेलियन ड्रेसिंगरुममध्ये