ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ कसोटी सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने शतकी खेळी केल्यानंतरही संघाला पराभवाचा सामना करावा लागला. ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या १-१ ने बरोबरीमध्ये आहे. पर्थ कसोटी सामन्यादरम्यान विराट कोहलीच्या आक्रमक स्वभावाबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र अनपेक्षितरित्या अनेक परदेशी खेळाडूंनी विराटला आपला पाठींबा दिला आहे. वेस्ट इंडिजचे माजी कर्णधार सर व्हीविअन रिचर्ड्स यांनी मात्र कोहलीला आपला पाठींबा दर्शवला आहे.

अवश्य वाचा – IND vs AUS : मी पाहिलेल्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी विराट एक – डेनिस लिली

“विराट अजुनही माझा सर्वात आवडता खेळाडू आहे. अनेकवेळा विराट त्याच्या क्षमतेपेक्षा काकणभर जास्तच खेळ करतो. त्याच्या मैदानातील वावरण्यामध्ये आक्रमकता असते, आणि ती दाखवण्यात काहीचं वावगं नाही. जर त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकला तर त्याच्या आनंदाला खरचं पारावार उरणार नाही.” सर रिचर्ड्स CricTracker संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

विराटच्या आक्रमकतेबद्दल विचारलं असताना रिचर्ड्स म्हणाले, जर तुम्ही एखाद्याला शेरेबाजी करुन भडकवण्याचा प्रयत्न केला तर तो साहजिकच तुम्हाला उलटं बोलून दाखवेल, आणि समोर विराट कोहलीसारखा भक्कम कर्णधार असेल तर हे होणारचं. मात्र या गोष्टीमध्ये मला काहीच वावगं वाटत नाही. अशा प्रकारांमध्ये संघाची बाजू घेण्यासाठीच तुम्हाला विराटसारख्या भक्कम आणि खंबीर कर्णधाराची गरज असते. रिचर्ड्स यांनी आपलं मत मांडलं.