तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने सामन्यावर वर्चस्व राखले. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ३३८ धावा केल्यानंतर भारतीय संघानेही चांगली झुंज देत २४४ धावा केल्या. पण तरीही भारतीय संघ पहिल्या डावाअखेर ९४ धावांनी पिछाडीवरच राहिला. शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा यांनी अर्धशतकी खेळी करत संघाला चांगला पाया रचून दिला. मधल्या फळीतील फलंदाजांनी भारतीय चाहत्यांची निराशा केली, पण तळाच्या फलंदाजांना हाताशी घेत रविंद्र जाडेजाने काही काळ झुंज दिली. जाडेजाने संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. या डावात भारताला दोन मोठे धक्के बसले.

भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंत याच्या कोपराला चेंडू लागल्याने त्याला फार काळ फलंदाजी करता आली नाही. तो ३६ धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीच्या वेळी तो मैदानावर यष्टीरक्षणासाठी उतरला नाही. त्याच्या दुखापतीचं गांभीर्य लक्षात येण्यासाठी त्याला स्कॅनसाठी घेऊन जाण्यात आलं. त्यानंतर भारताला आणखी एक धक्का बसला. भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजाच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. त्याने कशीबशी फलंदाजी केली. पण दुसऱ्या डावात गोलंदाजीसाठी मात्र तो येऊ शकला नाही. त्यालाही स्कॅनसाठी नेण्यात आल्याची माहिती BCCIकडून देण्यात आली.

जाडेजाने पहिल्या डावात सर्वाधिक ४ बळी टिपले होते. तसेच, स्मिथला धावबाद करण्याची जबाबदारीही पार पाडली होती. त्यामुळे जाडेजा मैदानाबाहेर राहणं हा भारतीय संघासाठी मोठा धक्काच आहे. पंतच्या जागी सध्या वृद्धिमान साहाला यष्टीरक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे. पण जाडेजाच्या जागी तितकाच चपखल पर्याय सध्यातरी भारतीय संघाकडे दिसत नाही. त्यामुळे आता जाडेजा पुन्हा मैदानावर कधी येतो याकडे चाहते डोळे लावून बसले आहेत.