बीसीसीआय कार्यकारिणी समितीची आज महत्त्वपूर्ण बैठक
‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणामुळे भारतीय क्रिकेट क्षेत्राला हादरविले असून, रविवारी होणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) तातडीच्या बैठकीमध्ये अटक करण्यात आलेल्या क्रिकेटपटूंवर कारवाईसंदर्भातील रुपरेषा निश्चित करण्यात येईल.
बीसीसीआयला भरगच्च आर्थिक कमाई करून देणाऱ्या आयपीएल क्रिकेट स्पध्रेत ‘स्पॉट-फिक्सिंग’ संदर्भातील दुसरे प्रकरण उजेडात आले आहे. बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या प्राथमिक अहवालाच्या आधारे त्यांच्यावर आजीवन बंदीची टांगती तलवार आहे. सदर विभागाचे प्रमुख रवी सवानीसुद्धा या बैठकीला हजर राहण्याची शक्यता आहे.
२००८मध्ये आयपीएलच्या अध्यायाला भारतीय क्रिकेटमध्ये प्रारंभ झाला, तेव्हापासून एकापाठोपाठ एक अनेक वादांनी या स्पध्रेला धक्के दिले आहेत. त्यामुळे आयपीएल स्पध्रेची पत राखण्यासाठी बीसीसीआयची कार्यकारिणी समिती या बैठकीमध्ये चर्चा करणार आहे.
या खेळाडूंच्या चौकशीचा अहवाल अद्याप आलेला नाही. या परिस्थितीत खेळाडूंवर कोणती तात्कालिन कारवाई करता येईल, याविषयी कार्यकारिणी समिती चर्चा करेल. ‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणी दोषी आढळल्यास खेळाडूंवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे संकेत बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन आणि आयपीएलचे प्रमुख राजीव शुक्ला यांनी आधीच दिले आहेत.
आयपीएल सुरूच राहणार – शुक्ला
नवी दिल्ली : गैरप्रकार होत असल्याने आयपीएल बंद करणे चुकीचे ठरेल, आयपीएल यापुढेही सुरूच राहील. ही फार मोठी स्पर्धा असून बऱ्याच खेळाडूंना याचा फायदा होत आहे. जर काही खेळाडू गैरप्रकार करत असतील, तर याचा अर्थ शेकडो खेळाडूंना तुम्ही दोषी ठरवू शकत नाही, असे आयपीएलचे प्रमुख राजीव शुक्ला यांनी सांगितले.