भारतीय संघाला उपांत्य फेरीत न्यूझीलंडच्या संघाकडून पराभव स्वीकारावा लागला. फलंदाजांच्या सुमार कामगिरीचा फटका भारताला बसला आणि भारताचे विश्वचषक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. २४० धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव २२१ धावांवरच आटोपला. स्पर्धेच्या महत्वाच्या सामन्यात भारतीय फलंदाजीतील उणिवा स्पष्टपणे दिसून आल्या. तसेच फलंदाजांच्या क्रमवारीवरूनही चाहते आणि क्रिकेट जाणकारांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे आता स्पर्धेतील कामगिरीबाबत BCCI ची प्रशासकीय समिती कर्णधार विराट कोहली, प्रशिक्षक रवी शास्त्री आणि सपोर्ट स्टाफ यांना जाब विचारणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

BCCI च्या प्रशासकीय समितीची सदस्य भारतीय संघाच्या विश्वचषक स्पर्धेतील कामगिरीचा आढावा घेण्यासाठी विराट कोहली, रवी शास्त्री आणि सहाय्यक पदाधिकारी यांची एक बैठक घेणार आहे. भारतीय संघ भारतात परतल्यानंतर ही आढावा बैठक घेण्यात येणार असून या बैठकीत उपांत्य फेरीतील संघ निवड आणि इतर महत्वाच्या विषयांवर विशेष चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय, सदस्य रवी थोडगे आणि महिला सदस्य डायना एलडजी हे तिघे टीम इंडियाच्या निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांच्याशीही खास बैठक घेणार आहेत. या बैठकीत ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी २० विश्वचषकासाठी भारतीय संघाची कशी तयारी करून घ्यायची याबाबत आरखडा ठरवण्याची चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, उपांत्य फेरीत भारतीय संघ स्पर्धेबाहेर गेला. सामन्यात भारतीय फलंदाजांची सुमार कामगिरी संघाला भोवली. स्पर्धेत दमदार कामगिरी करून भारताने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले होते. पण तीच कामगिरी उपांत्य फेरीत मात्र भारताला करता आली नाही.