इंग्लंडविरोधात काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा सहा विकेट्सनी पराभव झाला. टीम इंडियाच्या पाचही गोलंदाजांची इंग्रज फलंजाजांनी अक्षरशः पिसं काढली आणि टीम इंडियाने दिलेले ३३७ धावांचे विशाल आव्हान अगदी सहज पार केले.

या सामन्यात भारतीय संघाच्या पाचही गोलंदाजांनी इंग्रज फलंदाजांसमोर गुडघे टेकल्याचं बघायला मिळालं. तरीही कर्णधार विराट कोहलीने सहावा गोलंदाज म्हणून हार्दिक पांड्याकडे चेंडू सोपवला नाही. त्यामुळे क्रिकेटप्रेमींसह अनेक माजी दिग्गज क्रिकेटपटूंच्याही भुवया उंचावल्या. सामना संपल्यानंतर झालेल्या प्रेझेंटेशनमध्येही कोहलीला पांड्याला गोलंदाजी न देण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, येत्या काही महिन्यात भारतीय संघाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे हार्दिकला गोलंदाजी न देण्याचा निर्णय घेतल्याचं विराटने सांगितलं. यावरुन भारताचा माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेट समालोचक आकाश चोप्रा याने, जर हार्दिक पांड्या गोलंदाजी करणार नसेल तर भारतीय संघाला अंतिम एकदिवसीय सामन्यात कठोर निर्णय घ्यावा लागेल असं म्हटलं आहे.

“जर हार्दिक पांड्या गोलंदाजी करणार नसेल तर, अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाला खरंच काहीतरी कठोर निर्णय घ्यावा लागेल, फक्त पाच गोलंदाजांसह अंतिम सामन्यात खेळू शकत नाही”, असं चोप्राने ट्विटरद्वारे म्हटलंय.


दरम्यान, दुसऱ्या सामन्यात सहा विकेट्सने विजय मिळवल्याने तीन सामन्यांची मालिका आता १-१ अशा बरोबरीत आहे. त्यामुळे उद्या(दि.२८) होणाऱ्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्याला अंतिम सामन्याचं स्वरुप आलं असून हा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असणार आहे.