चेंडूची पकड बदलल्यामुळे गेल्या काही महिन्यांत माझी कामगिरी उंचावली असून योग्य नियंत्रणासह उजव्या यष्टीबाहेरील चेंडू टाकण्यात मी यशस्वी होत आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने व्यक्त केली.

३२ वर्षीय उमेशने नुकत्याच झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत एकूण १२ बळी मिळवले. त्याने दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात मिळवलेल्या पाच बळींच्या जोरावर भारताने एक डाव आणि ४६ धावांनी विजय मिळवला.

‘‘चेंडूची पकड बदलल्याचा मला फार फायदा झाला. पूर्वी मी ज्या प्रकारे चेंडू पकडायचो, त्यानुसार षटकात एखाद-दुसराच चेंडू स्विंग व्हायचा, अन्य चेंडू डाव्या यष्टीच्या दिशेने जायचे. त्यामुळे मला चेंडूवर नियंत्रण मिळवणे कठीण जायचे. परंतु गोलंदाजीचे प्रशिक्षक भरत अरुण आणि संघातील अन्य गोलंदाजांशी संवाद साधल्यामुळे मला माझी चूक लक्षात आली. त्यांच्या सल्ल्यानुसार मी चेंडूच्या पकडीत बदल केला. म्हणूनच या मालिकेत मी सातत्याने उजव्या यष्टीबाहेरील चेंडू टाकू शकलो,’’ असेही उमेशने सांगितले.

बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत मालिकावीराचा पुरस्कार पटकावणारा इशांत शर्मा म्हणाला, ‘‘चेंडू टाकताना मनगटाची दिशा बदलल्यामुळे मी या मालिकेत फलंदाजांना अडचणीत आणले. यापूर्वी चेंडू टाकताना माझे मनगट स्लीपच्या दिशेने वळलेले असायचे. त्यामुळे चेंडू उजव्या यष्टीच्या रेषेत पडून बाहेर जायचा. परंतु आता माझे मनगट मी सरळ ठेवण्यावर भर देतो. त्यामुळे चेंडू यष्टय़ांच्या दिशेने पडून फलंदाज पायचीत अथवा त्रिफळाचीत होण्याची शक्यता वाढते.’’