घरच्या मैदानात ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिकेत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात शनिवारपासून 5 वन-डे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. हैदराबादच्या मैदानावर दोन्ही संघ पहिला सामना खेळतील. 30 मे पासून इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या विश्वचषकाआधी भारतीय संघाची ही अखेरची वन-डे मालिका असणार आहे. त्यामुळे या मालिकेत भारतीय संघ कसा खेळ करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. पहिल्या सामन्याआधी सरावादरम्यान नेट्समध्ये धोनी दुखापतग्रस्त झाल्यामुळे भारतीय संघाच्या गोटात चिंतेच वातावरण पसरलं आहे.

अवश्य वाचा – IND vs AUS : पहिल्या वन-डे सामन्याआधी भारताच्या गोटात चिंता, सरावादरम्यान धोनीला दुखापत

हैदराबादच्या मैदानावर भारतीय संघाने आज सराव केला. विराट कोहली, शिखर धवन यांनी विशेषकरुन फलंदाजीच्या सरावावर भर दिला. या मालिकेत रोहित शर्माला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने भारतीय संघाच्या सरावाची क्षणचित्र आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केली आहेत.

टी-20 मालिकेत झालेला पराभव हा भारताचा विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली मायदेशातला पहिला मालिका पराभव ठरला आहे. त्यामुळे आगामी वन-डे मालिकेत भारतीय संघ पुनरागमन करतो का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.