IND vs WI : भारताचा कर्णधार विराट कोहली याने विंडीजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात १४० धावांची झंझावाती खेळी केली. दीडशतकाकडे वाटचाल करत असताना तो यष्टिचित झाला व त्याला दीडशतकाने हुलकावणी दिली. १०७ चेंडूंच्या त्याच्या खेळीत त्याने २१ चौकार आणि २ षटकार खेचले. बिशूच्या लेगस्पिनला विराट कोहली चकला आणि यष्टिरक्षक शाय होपने त्याला यष्टिचित केले.

दीडशतकाने जरी त्याला हुलकावणी दिली असली, तरी ही खेळी त्याच्यासाठी महत्वाची ठरली. त्याने ८८ चेंडूत १७ चौकार आणि १ षटकार खेचत शतक पूर्ण केले. हे त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील ३६वे शतक ठरले. ३६वे शतक ठोकण्यासाठी विराट कोहलीला २०४ डाव खेळले. या पराक्रमासह त्याने सचिनला मागे टाकले.

सचिनने ३६वे शतक हे ३११ डावांमध्ये केले होते. नोव्हेंबर २००३ मध्ये सचिनने हे शतक झळकावले होते.