सलग सातवी एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी भारत उत्सुक

आव्हानांचा समर्थपणे मुकाबला करीत मार्गक्रमण करणारा विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सलग सातवी एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी उत्सुक आहे. मुंबईतील पराभवानंतर पुण्यातील दुसऱ्या सामन्यामधील विजयानिशी बरोबरी साधण्यासाठी भारताने जी विजिगीषू वृत्ती दाखवली, तीच जर कानपूरला होणाऱ्या तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात दिसली, तर न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकणे मुळीच अवघड जाणार नाही.

पहिल्याच एकदिवसीय सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघावर मालिकेतील आव्हान टिकवण्यासाठी प्रचंड दडपण आले होते. मात्र दुसऱ्या सामन्यात दिमाखदार कामगिरीसह भारताने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. ग्रीन पार्क स्टेडियमवर प्रथमच होणाऱ्या प्रकाशझोतातील एकदिवसीय सामन्याविषयी कोहली म्हणाला, ‘‘आम्ही आव्हानांकडे सकारात्मक पद्धतीने पाहतो. पुण्यातील विजयानिशी आम्ही मालिकेत पुनरागमन केले. कानपूरलाही आम्ही त्याच पद्धतीने कामगिरी दाखवून विजय मिळवू.’’

पुण्यातील सामन्यात भारतीय संघाने आपल्या योजना उत्तम पद्धतीने राबवल्या. भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रारंभीच्या आणि अखेरच्या षटकांमध्ये आपली भूमिका चोख बजावली. मुंबईतील अपयशानंतर फिरकी गोलंदाजांनीही उत्तम गोलंदाजी केली. मुंबईत एकही बळी मिळवू न शकलेल्या युजवेंद्र चहलला दोन बळी मिळाले. ‘चायनामन’ कुलदीप यादवच्या जागी खेळणाऱ्या अक्षर पटेलने फॉर्मात असलेल्या टॉम लॅथमचा त्रिफळा उडवला. कामचलाऊ फिरकी गोलंदाज केदार जाधवने ८ षटके गोलंदाजी करताना ३१ धावा दिल्या. या परिस्थितीत कोहली हा विजयी संघ बदलण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे रविवारी घरच्या मैदानावर यादवला खेळण्याची संधी मिळते का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

भारताच्या फलंदाजीबाबत सकारात्मक घटना पुण्यात घडली. चौथ्या क्रमांकावर संधी मिळालेल्या दिनेश कार्तिकने नाबाद ६४ धावा काढून या स्थानाला न्याय दिला. २०१५च्या विश्वचषकापासून भारतीय संघाने चौथ्या क्रमांकावर तब्बल ११ फलंदाजांना अजमावले आहे. मात्र कार्तिकने आपली दावेदारी मजबूत केली आहे. कार्तिकने पहिल्या सामन्यात पाचव्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. परंतु चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करायला आपल्याला आवडते, असे कार्तिक सांगतो.

शिखर धवनला सहा डावांनंतर अर्धशतक साकारता आले, हीसुद्धा भारतासाठी सुखद गोष्ट ठरली. आक्रमक आणि शैलीदार फलंदाजी करणाऱ्या धवनकडून निर्णायक सामन्यातही अशाच प्रकारच्या अप्रतिम खेळीची अपेक्षा आहे. त्याचा सलामीचा साथीदार रोहित शर्मा धावांसाठी झगडत आहे. पहिल्या दोन सामन्यांत त्याने अनुक्रमे ७ आणि २० धावा केल्या आहेत.

न्यूझीलंडचा संघसुद्धा एकदिवसीय मालिकेत विजय मिळवण्यासाठी आतुर आहे. मात्र त्यासाठी किवींना मुंबईच्या कामगिरीची पुनरावृत्ती करावी लागणार आहे. वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडची ३ बाद ८० अशी अवस्था झाली असताना रॉस टेलर आणि लॅथम यांनी सामना जिंकून देणारी दोनशे धावांची भागीदारी केली होती. पुण्यात न्यूझीलंडच्या अव्वल तीन फलंदाजांनी पुन्हा निराशा केली. मात्र यावेळी टेलर किंवा लॅथम संघाला तारू शकले नाहीत. त्यामुळे न्यूझीलंडला २३० धावांपर्यंतच मजल मारता आली. केन विल्यमसनकडूनही कर्णधाराला साजेशा विजयी खेळीची आशा आहे.

ट्रेंट बोल्ट आणि टिम साऊदी यांच्यासारख्या सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांचा मारा न्यूझीलंडकडे असतानाही भारताच्या धावसंख्येला वेसण घालणे अवघड जात आहे. आतापर्यंत या एकदिवसीय मालिकेत एकदाही तीनशेचा टप्पा ओलांडला गेला नाही. मात्र कानपूरला हे साध्य होऊ शकते, असा जाणकारांचा अंदाज आहे. ग्रीन पार्कला झालेल्या अखेरच्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ३०३ धावा उभारल्या होत्या. मात्र भारताला पाच धावांनी पराभव पत्करावा लागला होता. याचप्रमाणे जानेवारी महिन्यात झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातही भारताचा पराजय झाला होता.

संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, केदार जाधव, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), हार्दिक पंडय़ा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर.

न्यूझीलंड : केन विल्यमसन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, कॉलिन डी ग्रँडहोमी, मार्टिन गप्तील, मॅट हेन्री, टॉम लॅथम, हेन्री निकोलस, अ‍ॅडम मिलने, कॉलिन मुन्रो, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साऊदी, रॉस टेलर, जॉर्ज वर्कर, इश सोधी.

सामन्याची वेळ : दुपारी १.३० वा. ’  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स.