अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या दहा बळींच्या जोरावर इंडिया ब्ल्यू संघाने दुलीप करंडकाला गवसणी घातली. ब्ल्यू संघाने इंडिया रेड संघापुढे विजयासाठी ५१७ धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना रेड संघाचा डाव १६१ धावांवर आटोपला आणि ब्ल्यू संघाने ३५५ धावांनी दणदणीत विजय मिळवला.

ब्ल्यू संघाच्या आव्हानाचा पाठलाग करताना रेड संघाकडून चांगली सुरुवात झाली नाही. जडेजासह परवेझ रसूल, कर्ण शर्मा यांनी रेड संघाच्या फलंदाजांना फिरकीच्या तालावर चांगलेच नाचवले. जडेजाने या वेळी रेड संघाचा अर्धा डाव संपुष्टात आणला, तर कर्णने तीन आणि रसूलने एक बळी मिळवला. पहिल्या डावात २५६ धावांची खेळी साकारणाऱ्या चेतेश्वर पुजाराला या वेळी सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

संक्षिप्त धावफलक

इंडिया ब्ल्यू : ६ बाद ६९३ (डाव घोषित) आणि ५ बाद १७९ (डाव घोषित) : मयांक अगरवाल ५२, रोहित शर्मा नाबाद ३२; कुलदीप यादव ३/६२) विजयी वि. इंडिया रेड : ३५६ आणि ४४.१ षटकांत सर्व बाद १६१ (गुरकीरट सिंग ३९; रवींद्र जडेजा ५/७६).

निकाल : इंडिया ब्ल्यू संघाचा ३५५ धावांनी विजय

सामनावीर : चेतेश्वर पुजारा