रंगतदार झालेल्या अखेरच्या साखळी सामन्यात भारताने नेपाळकडून १-२ असा पराभव पत्करला. मात्र गोलसंख्येच्या सरासरीत चांगली कामगिरी राखल्यामुळे भारताने सॅफ अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे.
दशरथ स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत नेपाळकडून अनिल गुरंग याने ७०व्या मिनिटाला तर जुमानु राय याने ८१व्या मिनिटाला गोल करीत संघाची बाजू बळकट केली. सामन्याच्या ९२व्या मिनिटाला भारताच्या सईद नबी याने गोल करीत ही आघाडी कमी केली, मात्र सामना बरोबरीत ठेवण्यात त्यांना अपयश आले.
नेपाळने तीन सामन्यांमध्ये सात गुण मिळवत गुणतालिकेतील अग्रक्रमांकासहित उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारताने तीन सामन्यांमध्ये चार गुण मिळविले.
अन्य लढतीत पाकिस्तानने बांगलादेशवर २-१ अशी मात केली, मात्र त्यांना उपांत्य फेरीत स्थान मिळविण्यात अपयश आले. अफगाणिस्तान व मालदीव यांनी यापूर्वीच उपांत्य फेरी निश्चित केली आहे. उपांत्य फेरीचे सामने ८ व ९ सप्टेंबर रोजी होणार आहेत.