वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी आज संघनिवड

मुंबई : पुढील महिन्यातील वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी एमएसके प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय निवड समिती शुक्रवारी भारताची संघनिवड करणार असून, या वेळी अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज महेंद्रसिंह धोनीचे भवितव्य आणि कर्णधार विराट कोहलीची उपलब्धता याकडे सर्वाचे लक्ष असेल.

३८ वर्षीय धोनी आता विजयवीराला साजेशी कामगिरी दाखवण्यात अपयशी ठरत आहे, याची निवड समितीच्या बैठकीत चर्चा होईल. धोनीने अद्याप क्रिकेटला अलविदा करण्यासंदर्भात कोणतीही वाच्यता केलेली नसली तरी त्याच्या निवृत्तीच्या अफवा गेले काही दिवस पसरल्या आहेत.

धोनीची निवड किंवा वगळणे यावर त्याचे आगामी काळातील भवितव्य अवलंबून असेल. ३ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या कॅरेबियन दौऱ्यावर भारतीय संघ तीन ट्वेन्टी-२०, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे.

ऑस्ट्रेलियात पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पाश्र्वभूमीवर भारतीय संघ सज्ज करण्याच्या हेतूने निवड समिती धोनीऐवजी युवा ऋषभ पंतला संघात स्थान देऊ शकेल. गेल्या काही महिन्यांत वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या ट्वेन्टी-२० मालिकांमध्ये धोनीला वगळण्यात आले होते. त्यामुळे धोनीची निवड होण्याची शक्यता कमीच दिसते आहे. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या भारतीय संघात दुखापतग्रस्त सलामीवीर शिखर धवनच्या जागी पंतचा बदली खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला होता.

यंदाच्या हंगामात देशात बऱ्याच मालिका खेळायच्या असल्यामुळे कर्णधार विराट कोहलीला विश्रांती दिली जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मर्यादित षटकांच्या क्रिकेट प्रकारांसाठी रोहित शर्माकडे नेतृत्व सोपवले जाऊ शकते. मात्र दोन कसोटी सामने हे ‘आयसीसी’ कसोटी अजिंक्यपदाचा भाग असल्यामुळे कोहलीचा कसोटी संघात समावेश करण्यात येईल. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराकडेही याच दृष्टिकोनातून पाहिले जाऊ शकते.

मधल्या फळीची चर्चा ऐरणीवर

विश्वचषक स्पर्धेत चिंतेचा विषय ठरलेल्या मधल्या फळीबाबत निवड समितीच्या बैठकीत गांभीर्याने चर्चा होईल. कर्नाटकचा मयांक अगरवाल आणि मनीष पांडे, मुंबईचा श्रेयस अय्यर हे पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध असतील. हे तिघेही सातत्याने धावा करीत आहेत. पांडेने भारत ‘अ’ संघाकडून खेळताना वेस्ट इंडिज ‘अ’ संघाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात सामना जिंकून देणारी शतकी खेळी साकारली होती. अंबाती रायुडूने अचानक निवृत्ती घेतल्यामुळे आणि विजय शंकर अपयशी ठरल्यामुळे चौथ्या क्रमांकाचा मुद्दा ऐरणीवर असेल. परंतु हे तिघे त्या स्थानासाठी कडवे दावेदार ठरतील.

अन्य मुद्दे

* निवड समितीपुढे पंजाबचा शुभमन गिल आणि मुंबईचा पृथ्वी शॉ या तरुण गुणवान फलंदाजांचेही पर्याय उपलब्ध आहेत. परंतु पृथ्वी अद्याप दुखापतीतून सावरलेला नाही. शुभमनने वेस्ट इंडिज दौऱ्यावर भारत ‘अ’ संघाकडून लक्षवेधी खेळी साकारल्या आहेत.

* विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत प्रभाव पाडण्यात अपयशी ठरलेला अनुभवी दिनेश कार्तिक आणि महाराष्ट्राचा अष्टपैलू क्रिकेटपटू केदार जाधव यांना भारतीय संघातील स्थान टिकवणे कठीण जाईल.

* धवन दुखापतीतून सावरला असेल, तर तो रोहितच्या साथीने सलामीची भूमिका बजावेल.

* मर्यादित षटकांच्या संघात लोकेश राहुल, हार्दिक पंडय़ा, कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल यांचे स्थान निश्चित असेल.

* वेस्ट इंडिज दौऱ्यावर अप्रतिम गोलंदाजी करणाऱ्या लेग-स्पिनर राहुल चहरच्या नावाचा निवड समिती विचार करू शकेल.

* भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी या नियमित वेगवान गोलंदाजांच्या साथीला दिल्लीचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी, खलील अहमद, दीपक चहर आणि आवेश खान हे पर्याय उपलब्ध असतील. डावखुरा वेगवान गोलंदाज खलील हा भारताच्या वेगवान माऱ्यात वैविध्य आणू शकेल.

*  कसोटी संघासाठी यष्टिरक्षक म्हणून पंतकडेच जबाबदारी सोपवली जाऊ शकते. कारण भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पंतने अप्रतिम कामगिरी केली होती. दुखापतीतून सावरलेला वृद्धिमान साहासुद्धा संघात पुन्हा स्थान मिळवू शकेल.

निवड समितीच्या बैठकीतून सचिव वजा

नवी दिल्ली : राष्ट्रीय निवड समितीच्या शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत समन्वयकाची भूमिका सरचिटणीसाकडे नसेल, तर निवड समितीच्या अध्यक्षाकडे असेल, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) प्रशासकीय समितीने स्पष्ट केले आहे. देशांतर्गत होणाऱ्या बैठकीत निवड समिती अध्यक्षाकडे, तर परदेश दौऱ्यावर प्रशासकीय व्यवस्थापक समन्वयकाची भूमिका पार पाडेल. त्यामुळे आता निवड समितीच्या बैठकीला सचिवांना उपस्थित राहता येणार नाही.