२०१८ सालात भारतीय क्रिकेट संघाच्या व्यस्त वेळापत्रकात आता आणखी एका दौऱ्याची भर पडली आहे. जून महिन्याच्या अखेरीस भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध दोन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. २७ आणि २९ जून रोजी भारत डबलीन येथे दोन आयर्लंडविरुद्ध दोन टी-२० सामने खेळणार आहे. २००७ सालानंतर भारतीय संघाचा हा आयर्लंडचा पहिला दौरा असणार आहे. मागच्या वेळी भारताने बेलफास्टच्या मैदानावर आयर्लंडविरुद्ध वन-डे सामना खेळला होता. ज्यात डकवर्थ लुईसच्या नियमानुसार भारताने ९ गडी राखून सामना जिंकला होता. रोहित शर्माने या सामन्यातून आपलं आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं.

मे महिन्याच्या अखेरीस आयपीएलचा अकरावा हंगाम संपल्यानंतर भारत इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्याआधी भारताला आयर्लंडविरुद्ध दोन टी-२० सामने खेळावे लागणार आहेत. इंग्लंड दौऱ्यात भारत ३ टी-२०, ३ वन-डे आणि ५ कसोटी सामने खेळणार आहे. भारतीय संघातले काही खेळाडू इंग्लंड दौरा सुरु होण्याआधी काऊंटी क्रिकेटमध्ये सहभागी होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

आतापर्यंत टी-२० सामन्यात भारत आणि आयर्लंड केवळ एकदा समोरासमोर आले आहेत. २००९ च्या टी-२० विश्वचषकादरम्यान नॉटिंगहॅममध्ये भारत विरुद्ध आयर्लंड सामना खेळवण्यात आला होता, ज्यात भारताने ८ गडी राखून विजय मिळवला होता. मागच्या वर्षात आयर्लंडसह अफगाणिस्तानला आयसीसीने कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या देशाचा दर्जा बहाल केला होता.