सिडनी कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी हनुमा विहारी आणि आर. अश्विन यांनी २५९ चेंडू खेळून काढत सामना अनिर्णीत राखला. अश्विन-हनुमा विहारी जोडाला फोडण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघानं बेंबीच्या देटापर्यंत प्रयत्न केले. कर्णधार टिम पेन यानं तर स्लेजिंगचाही वापर केला. मात्र, अश्विन-विहारी जोडीनं संयम ढासळू न देता आपलं काम चोख बचावलं. या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन याच्यावर सर्वच स्तरातून टीका होऊ लागली. हीच का तुमची खिलाडूवृत्ती, अशा संतापजनक प्रतिक्रिया येऊ लागल्या. अश्विनला बाद करण्यासाठी टिम पेन यानं स्लेजिंगही केली होती. यावरुनच सामन्यानंतर बोलताना टिम पेन यानं केलेल्या कृत्यावर एक प्रकारे पश्चाताप व्यक्त केला आहे.

अश्विनला केलेल्या स्लेजिंगबाबत सामन्यानंतर बोलताना टिम पेन म्हणाला की, आजच्या सामन्यातील माझं कृत्य एक चुकीचं उदाहरण म्हणून समोर आलं आहे. भविष्यात यापासून सावध राहायला हवं. माझ्या आयुष्यातील आजचा दिवस माझ्यासाठी खूप वाईट होता. यष्टीमागे मी सोडललेल्या झेलचा सामन्यावर निश्चितपणाने परिणाम झाला आहे. एखादा झेल मी घेतला असता तर आज सामन्याचा निकाल काही वेगळा लागला असता. त्यामुळे मी आज खूप निराश आहे. माझ्या यष्टीरक्षणावर मला गर्व आहे. पण आज नक्कीच माझ्याकडून खूप चुका झाल्या आहेत. अशा शब्दात टिम पेन यांनं सामन्यानंतर आपल्या चुकांची कबुली दिली.

आणखी वाचा- … तर आम्ही सामना जिंकून दिला असता – हनुमा विहारी

अश्विनसोबत केलेल्या स्लेजिंगबाबत टिम पेन नाराज आहे. सामन्यानंतर बोलताना पेन म्हणाला की, स्टंप माइक ब्रॉडकास्टचाच एक भाग असल्याचं आपल्या सगळ्यांना माहित आहे. लोकांना आमचं बोलणं ऐकायला मिळतं ही चांगली गोष्ट आहे. अश्विनसोबत मी चुकीच्या शब्दाचा वापर करत चुकीचं उदाहरण दिलं आहे. सामन्यानंतर मी या सर्व बाबीचा विचार केल्यानंतर स्वत:वर नाराज आहे. लोकांसमोर मला एक चांगलं उदाहरण द्यायला हवं होतं.

आणखी वाचा- भारतीय संघाला आणखी एक धक्का, जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त

अश्विन जेव्हा फलंदाजी करत होता, तेव्हा त्याच्यात आणि पेनमध्ये बाचाबाची झाली होती. ‘माझी नेतृत्व चांगलं नव्हतं. खेळाच्या दबाव माझ्यावर आला, ज्यामुळे माझी कामगिरीही चांगली झाली नाही. कर्णधार म्हणून मी खराब खेळलो, असं मी माझ्या सहकाऱ्यांना सांगितलं. मी माणूस आहे आणि माझ्या हातून चुका होऊ शकतात, त्याबद्दल मी माफी मागतो. सामन्यानंतर मी अश्विनशीही बोललो, दोघंही घडलेल्या घटनेवर हसलो, असेही पेन म्हणाला.

आणखी वाचा- लवकरच परतणार..! दुखापतग्रस्त भारतीय खेळाडूची पोस्ट

सामन्यादरम्यान काय झालं होतं?
रविचंद्रन अश्विन आणि हनुमा विहारी दोघांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना अक्षरश: रडवलं. भारताच्या या दोन फलंदाजांना बाद करण्यासाठी कर्णधार पेनने खूप प्रयत्न केले, पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. अखेर अश्विनचं चित्त विचलीत करण्यासाठी त्याने स्टंपच्या मागून बडबड सुरू केली. “आम्ही आता चौथ्या कसोटीसाठी खूपच आतूर आहोत. तुझा हा शेवटचा दौरा असेल नाा”, असा खोचक सवाल टीम पेनने केला. त्यावर अश्विननेही भन्नाट उत्तर दिलं. “तू भारतात ये… मी पण तुला भारतात खेळताना पाहण्यासाठी उत्सुक आहे. ती तुझी शेवटची मालिका असेल”, असं उत्तर देत त्याने पेनची बोलती बंद केली.