भारतीय महिला हॉकी संघाच्या खेळाडूंनी करोनाविरुद्ध लढ्यात आपला सक्रीय सहभाग नोंदवला आहे. करोनाग्रस्त रुग्णांच्या मदतीसाठी महिला हॉकीपटूंनी २० लाखांचा निधी उभा केला आहे. भारतीय महिला खेळाडूंनी १८ दिवसांचं फिटनेस चॅलेंज स्वीकारलं होतं. सोशल मीडियाचा वापर करत या महिला खेळाडूंनी प्रत्येकाला गरजू व्यक्तींसाठी १०० रुपये दान करण्याची विनंती केली होती. या माध्यमातून महिला खेळाडूंनी २० लाख १ हजार १३० रुपयांचा निधी जमा केला आहे. नवी दिल्लीतील उदय फाऊंडेशन या सामाजिक संस्थेला ही आर्थिक मदत केली जाणार आहे.

नवी दिल्लीतील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या गरजू व्यक्तींना यामधून मदत केली जाणार आहे. या उपक्रमात सहभागी करुन घेतल्याबद्दल भारतीय हॉकी संघाची कर्णधार राणी रामपालने समाधान व्यक्त केलं. सध्या करोना विषाणूचा फटका सर्व क्रीडा क्षेत्राला बसला आहे. हॉकी इंडिया आणि आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेनेही आपल्या सर्व महत्वाच्या स्पर्धा रद्द केल्या आहेत. त्यामुळे करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्यानंतर भारतीय खेळाडू पुन्हा मैदानावर कधी येतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.