रोहित शर्माच्या अनुपस्थितीत मिळालेल्या संधीचं सोनं करणाऱ्या लोकेश राहुलला त्याच्या कष्टाचं फळ मिळणार असं दिसतंय. भारतीय संघाच्या न्यूझीलंड दौऱ्यातील कसोटी सामन्यांच्या मालिकेत लोकेश राहुलचं कसोटी संघात पुनरागमन होण्याचे संकेत मिळत आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे मालिकेत लोकेश राहुलने फलंदाजीत सलामीवीराच्या जागेवर, मधल्या फळीत स्वतःला सिद्ध केलं आहे. याचसोबत पंतच्या अनुपस्थितीत राहुल यष्टीरक्षणाचीही भूमिका उत्तमपणे बजावतो आहे. न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा रविवारी होणार आहे.

अवश्य वाचा – Ind vs Aus : अष्टपैलू कामगिरीसह राहुलने मोडला धोनीचा विक्रम

२०१९ साली खराब कामगिरीमुळे लोकेशला संघातलं स्थान गमवावं लागलं होतं. यानंतर रोहित शर्माला कसोटीत सलामीची संधी मिळाली, रोहितनेही संधीचा पुरेपूर फायदा उचलत सलामीच्या स्थानावर आपला हक्क सांगितला. मात्र आता लोकेश राहुलला पुन्हा एकदा कसोटी संघात संधी मिळू शकते. पृथ्वी शॉ किंवा शुभमन गिल यांसारख्या नवीन खेळाडूंऐवजी निवड समिती लोकेश राहुलच्या अनुभवाला प्राधान्य देऊ शकते.

याव्यतिरीक्त वन-डे संघातही अष्टपैलू हार्दिक पांड्या पुनरागमन करण्याची शक्यता आहे. टी-२० मालिकेसाठी संघाची घोषणा होताना हार्दिकचं नाव वगळण्यात आलं होतं. मात्र हार्दिक आता आपल्या पाठीच्या दुखापतीमधून सावरला असून तो संघात पुनरागमनासाठी सज्ज आहे. याव्यतिरीक्त केदार जाधवच्या जागी संघात सूर्यकुमार यादव किंवा अजिंक्य रहाणे यांचीही वर्णी लागण्याची शक्यता आहे.