नुकत्याच संपलेल्या कसोटी मालिकेतील भारतीय संघाच्या विजयाचं आणि ऑस्ट्रेलियाच्या पराभवाचं क्रिकेट तज्ज्ञांकडून वेगवेगळया अंगानं विश्लेषण सुरु आहे. खरंतर या मालिकेत भारतीय संघाच्या तुलनेत ऑस्ट्रेलियाला वरचढ ठरण्याची संधी होती. कारण ऑस्ट्रेलियन संघ मायदेशात खेळत होता. तिथल्या खेळपट्टया, वातावरण सर्वच त्यांना अनुकूल होते. पण युवा भारतीय संघाने जिद्दीच्या बळावर बलाढय ऑस्ट्रेलियाचा पराभवाची धूळ चारली.

ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार इयन चॅपल यांनी या मालिकेचे विश्लेषण करताना काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. पहिल्या कसोटीनंतर नियमित कर्णधार विराट कोहली मायदेशी परतला. त्यानंतर चौथ्या कसोटीत दुखापतीमुळे रविंद्र जाडेजा, आर.अश्विन, विहारी हे प्रमुख खेळाडू संघाबाहेर होते. खरंतर दुखापतीमुळे भारताची बाजू सुरुवातीला कमकुवत वाटली होती. पण संघात समावेश झालेल्या युवा खेळाडूंनी मिळालेल्या संधीचे सोने केले.

इयन चॅपल यांनी सिडनी मॉर्निंग हेराल्डमधील आपल्या स्तंभात हाच मुद्दा मांडला आहे. दुखापती या भारतीय संघासाठी वरदान ठरल्या. त्यामुळे प्रत्येक कसोटीत भारतीय संघाला नव्या, ताज्या दमाच्या खेळाडूंचा समावेश करावा लागला. “ऑस्ट्रेलियानं बिलुकल या उलट केले. ऑस्ट्रेलिया चारही कसोटी सामन्यात त्याच चार गोलंदाजांना घेऊन खेळली. त्यामुळे मालिकेच्या अखेरीस ते थकले होते. त्यांची दमछाक झाली” याकडे इयन चॅपल यांनी लक्ष वेधले आहे.

“प्रत्येक कसोटी सामन्यात त्याच चार वेगवान गोलंदाजांना घेऊन खेळणे ही ऑस्ट्रेलियाची सर्वात मोठी चूक होती. वेगवान गोलंदाजांनी पाच आठवडयात चार कसोटी सामने खेळणे म्हणजे चार मॅरेथॉन स्पर्धांमध्ये धावण्यासारखे आहे. सिडनीत मिचेल स्टार्कच्या बाबतीत ती गोष्ट जाणवली” असे इयन चॅपल यांनी लिहिले आहे.

“दुसऱ्याबाजूला दुखापती भारतासाठी सुदैवी ठरल्या. दुखापतीमुळे शेवटच्या कसोटीत भारताल ताज्या दमाच्या वेगवान गोलंदाजांना संधी देणे भाग पडले. माझ्या मते तेच निर्णायक ठरले” असे इयन चॅपल यांनी आपल्या स्तंभात लिहिले आहे.