IPL 2019 च्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्ज संघाने शनिवारी पुन्हा एकदा विजय मिळवला. मुंबई बरोबरच्या सामन्यात चेन्नईने पराभव स्वीकारला. तो त्यांचा हंगामातील पहिला पराभव होता. त्या आधी तीनही सामने त्यांनी जिंकले होते. त्यानंतर शनिवारी घरच्या मैदानावर खेळत असताना चेन्नईने पंजाबवर २२ धावांनी मात केली. १६१ धावांच्या आव्हान घेऊन मैदानात उतरलेला पंजाबचा संघ १३८ धावांपर्यंतच मजल मारु शकला. चेन्नईचा या हंगामातला हा चौथा विजय ठरला आहे. या सामन्यात हरभजन सिंगने उत्तम गोलंदाजी करत चेन्नईच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

या विजयनानंतर बोलताना हरभजन सिंगने एक गोष्ट स्पष्ट केली आहे. हरभजन म्हणाला की चेन्नईच्या संघात आम्ही सामना जिंकावा अशी अपेक्षा केली जाते. पण त्यासाठी आमच्यावर दबाव टाकला जात नाही. मुंबईच्या संघाबाबत मला आदर आहे. पण मुंबईच्या संघात मात्र सामना जिंकावाच लागायचा. त्याउलट चेन्नईच्या संघात पराभव म्हणजे जीवनमरणाचा प्रश्न नाही.

दरम्यान, १६१ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पंजाबची सुरुवात खराब झाली. भरवशाचा ख्रिस गेल झटपट माघारी परतला. यानंतर मयांक अग्रवालही हरभजन सिंहच्या गोलंदाजीवर माघारी परतला. मात्र यानंतर लोकेश राहुल आणि सरफराज खान यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. या खेळीदरम्यान दोघांनीही आपलं अर्धशतक पूर्ण केलं. मात्र मोक्याच्या षटकांमध्ये धावगती वाढवणं त्यांना जमलं नाही.

विश्वचषक संघाची १५ एप्रिलला घोषणा होणार आहे. या संघात हरभजनला संधी मिळणार का? याची साऱ्यांनाच उत्सुकता आहे. त्याबाबत बोलताना हरभजन म्हणाला की मी IPL मध्ये चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करत आहे. जर मला संघात स्थान देण्यात आले, तर मी खरंच संघात पुनरागमन करण्यास उत्सुक आहे.

याचाच परिणाम म्हणजे, अखेरच्या ४ षटकांमध्ये पंजाबसमोरचं आव्हान वाढलं. त्यातचं चेन्नईच्या गोलंदाजांनी अखेरच्या षटकांत टिच्चून मारा करत पंजाबच्या फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची संधी दिली नाही. लोकेश राहुल मोठा फटका खेळण्याच्या नादात माघारी परतला. 19 व्या षटकात दिपक चहरने सुरुवातीच्या दोन चेंडूवर स्वैर मारा करत चिंतेचं वातावरण निर्माण केलं. मात्र त्यानंतर जोरदार पुनरागमन करत दिपकने डेव्हिड मिलरचा त्रिफळा उडवला.

यानंतर विजयासाठी आवश्यक असलेल्या २६ धावा पूर्ण करणं पंजाबला जमलं नाही. अखेरीस चेन्नईने २२ धावांनी विजय मिळवत स्पर्धेत दणक्यात पुनरागमन केलं. चेन्नईकडून हरभजन सिंह आणि स्कॉट कुगलेजीनने प्रत्येकी २-२, तर दिपक चहरने १ बळी घेतला.

याआधी,पंजाबच्या गोलंदाजांनी टिच्चून केलेल्या माऱ्यामुळे पंजाबने चेन्नई सुपरकिंग्जला १६० धावांवर रोखण्यात यश मिळवलं. चेन्नई सुपरकिंग्जने घरच्या मैदानावर सामना खेळत असताना नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शेन वॉटसन आणि फाफ डु प्लेसिस यांनी आश्वासक भागीदारी करुन दिली. मात्र रविचंद्रन आश्विनने शेन वॉटसनला माघारी धाडत चेन्नईला धक्का दिला.

यानंतर पंजाबच्या सर्व गोलंदाजांनी चेन्नईच्या फलंदाजांवर अंकुश लावला. डु प्लेसिस, सुरेश रैना देखील आश्विनच्या फिरकीचे शिकार होऊन माघारी परतले. यानंतर अंबाती रायुडू आणि महेंद्रसिंह धोनीने अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत संघाला १५० धावांचा पल्ला गाठून दिला. पंजाबकडून कर्णधार रविचंद्रन आश्विनने ३ बळी घेतले.