IPL 2019 Final MI vs CSK : IPL च्या अंतिम सामन्यात पहिल्या डावाच्या अंतिम टप्प्यात कायरन पोलार्डने (४१*) केलेल्या फटकेबाजीच्या बळावर मुंबईने २० षटकात ८ बाद १४९ धावा केल्या आणि चेन्नईला १५० धावांचे आव्हान दिले. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. अत्यंत संयमी सुरुवात करणाऱ्या रोहित शर्माने दुसऱ्या षटकात अखेर उत्तुंग असा पहिला षटकार लगावला. महत्वाचे म्हणजे हा षटकार लगावल्यानंतर चेंडू गायब झाला. त्यामुळे सामन्यात नवा चेंडू घेण्यात आला. रोहितने पहिला षटकार लगावल्यानंतर पुढच्याच षटकात क्विंटन डी कॉकने दीपक चहरचा समाचार घेतला. त्याने त्याच्या एकाच षटकात तब्बल ३ षटकार लगावले. ४ षटकार फटकावल्यानंतर एक आखूड टप्प्याचा चेंडू टोलवताना सलामीवीर डी कॉक झेलबाद झाला आणि मुंबईला पहिला धक्का बसला. त्याने १७ चेंडूत २९ धावा केल्या. डी कॉक पाठोपाठ कर्णधार रोहित शर्माही झेलबाद झाला आणि मुंबईला दुसरा धक्का बसला. रोहितने १ चौकार आणि १ षटकार खेचत चांगली सुरुवात केली होती, पण मोठा फटका खेळताना त्याचा अंदाज चुकला आणि तो बाद झाला. त्याने १५ धावा केल्या.

प्ले ऑफ्स च्या पहिल्या सामन्यात चेन्नईविरुद्ध मुंबईला विजय मिळवून देणारा सूर्यकुमार यादव या सामन्यात स्वस्तात त्रिफळाचीत झाला. त्याने १५ धावा केल्या. फलंदाजीच्या क्रमवारीत बढती मिळालेल्या कृणाल पांड्याला लवकर माघारी परतावे लागले. त्याने केवळ ७ धावा केल्या. आखूड टप्प्याचा चेंडू टोलवताना तो झेलबाद झाला. शार्दुलने धावत जाऊन उत्कुष्ट झेल टिपला. चेंडू झेलताना शार्दुलच्या हातून चेंडू निसटतोय असे वाटत असतानाच त्याने झेल टिपला.

त्यानंतर खेळपट्टीवर स्थिरावलेला ईशान किशन मोठा फटका खेळताना झेलबाद झाला. त्याने २६ चेंडूत २३ धावा केल्या. यात ३ चौकारांचा समावेश होता. मोठे फटके खेळणारा हार्दिक पांड्या पायचीत झाला. पांड्याने DRS ची मदत घेतली, पण तरीही तिसऱ्या पंचांनी त्याला बादच ठरवले. हार्दिकने १६ धावा केल्या. अखेर BIrthday Boy कायरन पोलार्डने शेवटच्या टप्प्यात फटकेबाजी करत मुंबईला १४९ धावांपर्यंत पोहोचवले. पोलार्डने ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने २५ चेंडूत नाबाद ४१ धावा केल्या.