जयपूर येथे मंगळवारी झालेल्या IPL Auction 2019 मध्ये तामिळनाडूचा Mystery Boy वरुण चक्रवर्ती याला तब्बल ८ कोटी ४० लाख किंमत देऊन किंग्ज इलेव्हन पंजाबने आपल्या संघात घेतले. त्याची मूळ किंमत केवळ २० लाखांची होती. पण देशांतर्गत स्पर्धांमध्ये केलेल्या कामगिरीचा फायदा त्याला IPL 2019 मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी झाला. यात तामिळनाडू प्रिमीयर लीग स्पर्धेतील त्याची कामगिरी अधिक महत्वाची ठरली.

वरुण बद्दल महत्वाची बाब म्हणजे तो आधी वेगवान गोलंदाजी करत असे. पण त्यानंतर त्याने एका कारणामुळे फिरकी गोलंदाजीला पसंती दिली आणि याच फिरकीच्या जोरावर तो IPL 2019 मध्ये कोट्यवधींचा धनी ठरला.

 

वरुण हा तामिळनाडू संघाचा mystery spinner म्हणून ओळखला जातो. त्याने यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. १३ व्या वर्षांपासून तो क्रिकेट खेळत होता. पण महाविद्यालयामुळे त्याला क्रिकेट थांबवावे लागले होते. पदवीचे शिक्षण आणि दोन वर्षे नोकरी केल्यानंतर त्याने पुन्हा खेळायला सुरुवात केली होती. पण तेव्हा तो वेगवान गोलंदाज म्हणून खेळत होता. त्यानंतर मात्र गुढघ्याच्या दुखापतीमुळे त्याला फिरकी गोलंदाजीचा आधार घ्यावा लागला. पण हीच फिरकी गोलंदाजी त्याला कामी आली आणि तो IPL 2019 मधील महागडा खेळाडू ठरला.

TNPL मुळे मला खूप फायदा झाला. माझ्यासोबत संघात अनेक अनुभवी खेळाडू होते. त्यांनी मला खूप काही टिप्स दिल्या आणि खूप काही शिकवले. मला मोठ्या प्रेक्षकवर्गासमोर स्वतःला कसे शांत ठेवावे आणि कामगिरीवर लक्ष कसे केंद्रित करावे हे समजले, असे वरुणने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते. त्याचाच फायदा त्याला येथे झालेला दिसला.