करोनाच्या पार्श्वभूमीवर अनिश्चततेचं सावट असणाऱ्या IPLचं संयुक्त अरब अमिरातीत आयोजन करण्याचा मार्ग मोकळा झाला असून त्यासाठी सर्व संघांनी तयारी केली आहे. संघांनी नेट प्रॅक्टिस सुरु केली असून कोणत्या संघात नवे चेहरे पहायला मिळणार याची उत्सुकता चाहत्यांना आहे. दरम्यान विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ताफ्यात गोलंदाज आदित्य ठाकरेची निवड करण्यात आली आहे.

राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंच्या नावाशी साधर्म्य असल्याने सध्या आरसीबी संघ चर्चेत आहे. आदित्य ठाकरे हा विदर्भाचा गोलंदाज आहे. २०१८ मध्ये खेळाडू जखमी झाल्यानंतर ज्युनिअर वर्ल्ड कपसाठी आदित्यला न्यूझीलंडला पाठवण्यात आलं होतं. तिथे केलेल्या दमदार कामगिरीमुळे तो प्रकाशझोतात आला होता. आदित्यने स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे.

संग्रहित (PTI)

आदित्य RCB च्या Development Squad चा भाग असणार आहे. सध्या नेट्समध्ये फलंदाजांना सराव देण्यासाठी आदित्यची निवड करण्यात आली आहे. पण नेट्समध्ये चांगली कामगिरी केल्यास आदित्यला संघातही स्थान मिळण्याची शक्यता आहे. असे झाल्यास चाहत्यांना आदित्य ठाकरेला मैदानात खेळतानाही पहायला मिळू शकतं. सोबत विराट कोहली असल्याने आदित्यकडे भारतीय संघाच्या कर्णधारावर छाप पाडण्याचीही नामी संधी आहे.