IPL 2020 ला २९ मार्चपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेची सुरूवात मुंबई विरूद्ध चेन्नई या सामन्याने होणार आहे. स्पर्धेत राजस्थानचा पहिला सामना चेन्नईशी २ एप्रिलला होणार आहे. पण त्याआधीच राजस्थान रॉयल्स संघाला एक मोठा धक्का बसला आहे. राजस्थान संघातील वेस्ट इंडिजचा जलदगती गोलंदाज ओशेन थॉमस याच्या कारला मोठा अपघात झाला. त्यामुळे सध्या ओशेनला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.

वेस्ट इंडिजचा ओशेन थॉमस हा ‘आयपीएल’मध्ये राजस्थान संघाकडून खेळतो. २०१८ मध्ये राजस्थानकडून ओशेनने ‘आयपीएल’मध्ये पदार्पण केले. ओशेन स्वत: गाडी चालवत होता. त्यावेळी हा अपघात झाला. ओशेनच्या ऑडी गाडीचा या अपघातात चक्काचूर झाला. रविवारी रात्री उशीरा महामार्गावर ओशेनची कार उलटली. या अपघातात सुदैवाने ओशेन बचावला. दोन वाहनांच्या टक्करमध्ये ओशेन याच्या कारचा मात्र चक्काचूर झाला. ओशेनच्या अपघातामुळे राजस्थान संघाच्या चिंता वाढल्या आहेत.

‘रविवारी रात्री उशीरा दोन वाहनांची धडक झाली. यात ओशेनच्या कारचा समावेश होता. सेंट कॅथरीन येथील ओल्ड हार्बरजवळ हायवे 2000 वर हा अपघात घडला. या अपघातातील एका कारमध्ये थॉमसदेखील होता. अपघातानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. जमैका ऑब्जर्व्हरने थॉमसच्या जवळच्या मित्रांना विचारले असता, त्याच्यावर उपचार व स्कॅन करून त्याला रुग्णालयातून सोडण्यात आले’, असे वेस्ट इंडीज प्लेयर्स असोसिएशनने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, ‘आयपीएल’च्या आधी थॉमसचा अपघात झाल्यामुळे राजस्थान रॉयल्स संघाला मोठा झटका बसला आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात चांगली कामगिरी केली असल्याने राजस्थाला त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत.