युएईत दाखल झालेल्या चेन्नई सुपरकिंग्ज संघासमोरची चिंता काही केल्या कमी होत नाहीये. शुक्रवारी संध्याकाळी संघाचा प्रमुख गोलंदाज दीपक चहर आणि सपोर्ट स्टाफमधील १२ जणांचा करोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता. यानंतर शनिवारी संघातला मराठमोळा खेळाडू ऋतुराज गायकवाडलाही करोनाची लागण झाल्याचं कळतंय. ज्या खेळाडूंचा करोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे त्यांना तात्काळ क्वारंटाइन करण्यात आलं आहे. स्थानिक सरकारचे नियम आणि बीसीसीआच्या मार्गदर्शक तत्वांनुसार त्यांना पुढचे काही दिवस रहावं लागणार आहे. करोनाग्रस्त खेळाडूंना १४ दिवस क्वारंटाइन व्हावं लागणार असून दहाव्या, तेराव्या आणि चौदाव्या दिवशी खेळाडूंची पुन्हा एकदा करोना चाचणी करण्यात येईल. ही चाचणी निगेटीव्ह आल्यानंतरच त्यांना पुन्हा एकदा संघात दाखल करुन घेतलं जाईल.

चेन्नईच्या संघात लागोपाठ दुसऱ्या खेळाडूला करोनाची लागण झाल्याचं कळताच, त्या खेळाडूंच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचीही करोना चाचणी करण्यात येत आहे. लागोपाठ दोन खेळाडूंना करोनाची लागण झाल्यामुळे इतर खेळाडूंनाही आणखी काही दिवस क्वारंटाइन व्हावं लागणार असून १ सप्टेंबरनंतर त्यांना सरावाची परवानगी मिळणार आहे. लागोपाठ दोन खेळाडूंना करोनाची लागण झाल्याचं समजताच बीसीसीआयनेही खबरदारीचा उपाय म्हणून स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा थांबवली आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 मधून सुरेश रैनाची माघार

दरम्यान, दुबईत दाखल झालेल्या चेन्नई सुपरकिंग्जच्या खेळाडूंनी बीसीसीआयच्या सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचं उल्लंघन केल्याचं बोललं जातंय. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओत चेन्नईचे खेळाडू हॉटेलमध्ये पोहचल्यानंतर स्थानिक व्यक्तीसोबत हात मिळवून त्याची गळाभेट घेताना दिसत आहे. बीसीसीआयने सर्व खेळाडूंना सोशल डिस्टन्सिंगसह संघाबाहेर व्यक्तीच्या संपर्कात न येण्याचा नियम घालून दिलाय. मात्र चेन्नईच्या खेळाडूंकडून याच नियमाचं उल्लंघन झाल्याचं बोललं जातंय. त्यामुळे आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – Viral Video : CSK च्या खेळाडूंकडून BCCI नियमांचा भंग?? सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा…