इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) सातवा हंगाम भारतात बहरणार की परदेशात, या साऱ्या चर्चाना पूर्णविराम देऊन बुधवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) १६ एप्रिल ते १ जूनदरम्यान होणाऱ्या आयपीएल स्पध्रेसंदर्भातील ठिकाणांचा प्रश्न निकालात काढला. आयपीएलच्या पहिल्या टप्प्याचे सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणार आहेत, तर दुसऱ्या टप्प्यातील काही सामन्यांसाठी बांगलादेशचा राखीव पर्याय जाहीर केला आहे.
देशात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर आयपीएलच्या सातव्या पर्वातील काही भाग परदेशात खेळवण्यात येणार आहेत. परंतु १३ मेपासून स्पध्रेचा अखेरचा टप्पा भारतात खेळवण्यात येणार आहे. याचप्रमाणे १ मेपासूनच स्पध्रेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामने देशात व्हावेत, याकरिता बीसीसीआयने केंद्र सरकारची परवानगी मागितली आहे. ज्या राज्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल, त्या ठिकाणी स्पध्रेसाठी सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आल्या, तरच हे शक्य होऊ शकणार आहे.
‘‘पेप्सी आयपीएलच्या यंदाच्या हंगामाला बुधवारी, १६ एप्रिल २०१४ला प्रारंभ होईल आणि रविवारी, १ जून २०१४ या दिवशी स्पर्धा संपेल,’’ अशी माहिती बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी दिली.
आयपीएलच्या प्राथमिक टप्प्यातील सामने संयुक्त अरब अमिरातीमधील अबू धाबी, दुबई आणि शारजा या ठिकाणी १६ ते ३० एप्रिल या कालावधीत होतील. ‘‘संयुक्त अरब अमिरातीमध्ये १६ ते ३० एप्रिल यादरम्यान किमान १६ सामने होतील. या कालावधीत आयपीएलच्या सामन्यांच्या आयोजनासाठी अमिराती क्रिकेट मंडळ व त्यांचे अध्यक्ष एच. एच. शेख नाहायन मबारक अल नाहायन आणि संयुक्त अरब अमिरातीमधील सरकार यांनी बीसीसीआयला संपूर्ण पाठिंबा दर्शवला आहे,’’ असे बीसीसीआयने पत्रकात म्हटले आहे.
आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यासाठी बांगलादेशचा तात्पुरता पर्याय ठेवण्यात आला आहे. परंतु केंद्र सरकारने हिरवा कंदील दिल्यास या टप्प्यातील सामने भारतातच होऊ शकतील. ‘‘१ ते १२ मे या कालावधीतील आयपीएल सामने भारतात व्हावे, याकरिता बीसीसीआयने गृहमंत्रालयाकडे परवानगी मागितली आहे. ज्या राज्यांमध्ये निवडणुका झाल्या असतील, त्या ठिकाणच्या शहरांमध्ये हे सामने होतील. याबाबत बीसीसीआयला सकारात्मक अपेक्षा आहेत. हे सामने भारतात होऊ शकले नाहीत, तर ते बांगलादेशमध्ये होतील,’’ असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.
आयपीएलच्या अखेरच्या टप्प्यातील सामन्यांच्या आयोजनासाठी बीसीसीआयला कोणत्याही अडचणी येणार नाहीत. सर्व राज्यांमधील निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर १३ मेपासून साखळी ते प्ले-ऑफपर्यंतचे उर्वरित सर्व सामने भारतात होणार आहेत. १६ मे रोजी मतमोजणीच्या दिवशी कोणतेही सामने होणार नाहीत. मतमोजणीच्या दिवसाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही बंधनांसंदर्भात आम्ही निवडणूक विभागाचा सल्ला घेऊ, असे बीसीसीआयने नमूद केले आहे. आयपीएलचा संपूर्ण कार्यक्रम लवकरच जाहीर होईल, असेही जाहीर करण्यात आले आहे.
भारतात ७ एप्रिल ते १२ मे या कालावधीत लोकसभेच्या निवडणुका होणार असल्यामुळे केंद्र सरकारने आयपीएल सामन्यांना सुरक्षा व्यवस्था नाकारली होती. निवडणुकांमुळे दुसऱ्यांदा आयपीएल स्पर्धा भारताबाहेर खेळवण्यात येत आहे. २००९मध्ये संपूर्ण आयपीएल स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत झाली होती. बीसीसीआयचे पदाधिकारी आणि आयपीएलचे प्रमुख रणजीब बिस्वाल यांची गेले काही दिवस गृहमंत्रालयाशी बोलणी सुरू आहेत. या स्पध्रेत आठ संघांचा सहभाग आहे.

आयपीएलचा सातवा हंगाम असा बहरणार
१६ ते ३० एप्रिल    संयुक्त अरब अमिराती
१ ते १२ मे             भारतात (केंद्र सरकारने परवानगी नाकारल्यास बांगलादेशमध्ये)
१३ मे ते १ जून     भारतात
१६ मे                   मतमोजणीनिमित्त सामने होणार नाहीत.

आयपीएलचा हंगाम ७ दिवस लवकर संपणार
आयपीएलमधील सहभागी संघांची संख्या नऊऐवजी आठ झाल्यामुळे यंदाचा हंगाम आठवडाभर लवकर संपणार आहे. या वर्षी फक्त ४७ दिवसांचे आणि ६० सामन्यांचे सातवे पर्व असणार आहे. मागील वर्षी सहाव्या हंगामात नऊ संघ सहभागी होते. त्यामुळे ५४ दिवसांत ७६ सामने झाले होते.

बीसीसीआयच्या निर्णयाचे आयसीसीकडून स्वागत
दुबई : आयपीएल स्पध्रेतील पहिल्या टप्प्यांचे सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) मुख्य कार्यकारी डेव्हिड रिचर्ड्सन यांनी स्वागत केले आहे. ‘‘संयुक्त अरब अमिराती भागातील जनतेसाठी ही आनंदाची बातमी आहे. हा संयुक्त अरब अमिरातीसाठी खूप संस्मरणीय हंगाम असेल. २०१३मध्ये आयसीसी विश्व अजिंक्यपद स्पध्रेतील पात्रता फेरीच्या सामन्याचे यजमानपद त्यांनी सांभाळले होते. याचप्रमाणे नुकतीच १९ वर्षांखालील वयोगटासाठी युवा विश्वचषक स्पर्धा या ठिकाणी झाली आहे,’’ असे रिचर्ड्सन यांनी सांगितले.