दुसऱ्या दिवसाअखेरीस कसोटीवर वर्चस्व मिळवलेल्या भारतीय संघाला तिसऱ्या दिवसाच्या खेळात मोठा धक्का बसला. जोश हेजलवूड आणि पॅट कमिन्स यांनी भेदक मारा दुसऱ्या डावात अवघ्या ३६ धावांमध्ये भारताचा डाव संपवला. भारताचे सर्व धुरंधर फलंदाज दुसऱ्या डावात सपशेल अपयशी ठरले. कर्णधार विराट कोहलीनेही पराभवानंतर हताश प्रतिक्रिया व्यक्त केली. या कसोटी मालिकेतला दुसरा सामना २६ डिसेंबरपासून मेलबर्नच्या मैदानावर रंगणार आहे. विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे भारताचं नेतृत्व करेल. या कसोटीसाठी लोकेश राहुलला भारतीय संघात स्थान मिळायला हवं असं मत माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने व्यक्त केलं आहे.

“मेलबर्न कसोटीबद्दल बोलायला गेलं तर भारतीय संघासमोर अजुनही समस्या कायम आहेत. जर संघात बदल करायचे असतील तर टीम मॅनेजमेंटसमोर बरेच पर्याय उपलब्ध आहेत. विराट कोहली आता भारतात परतेल, लोकेश राहुल-शुबमन गिल यांचा पर्याय भारताकडे उपलब्ध आहे. माझ्यामते लोकेश राहुलला संधी मिळायला हवी कारण त्याच्याकडे अनुभव आहे.” कैफ Sony Sports वाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होता.

अवश्य वाचा – भारताच्या पराभवासाठी फलंदाजांना दोष देणं योग्य ठरणार नाही – सुनिल गावसकर

काही महिन्यांपूर्वी खराब कामगिरीमुळे राहुलला संघातलं स्थान गमवावं लागलं होतं. त्यानंतर त्याने खूप मेहनत घेतली आहे. त्याच्या खेळातही सुधारणा झाली आहे. वन-डे, टी-२० मध्ये त्याने चांगला खेळ केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत त्याची कामगिरी चांगली आहे, यासाठी त्याला संघात स्थान मिळायला हवं असं कैफ म्हणाला.