पाकिस्तानचे माजी दिग्गज क्रिकेटपटू झहीर अब्बास यांनी विराट कोहली सचिन तेंडुलकरचे सर्व विक्रम मोडेल असा अंदाज वर्तवला आहे. पाकिस्तानच्या GTV वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमात सहभागी होताना झहीर अब्बास यांनी हे वक्तव्य केलं आहे. यावेळी अब्बास यांनी विराट आणि सचिनची तुलना करताना दोन्ही खेळाडू खेलत असलेला कालखंडही लक्षात घेण्याचं म्हटलं आहे. विराट कोहलीच्या नावावर वन-डे क्रिकेटमध्ये 39 शतकांची नोंद आहे. सचिनच्या 49 शतकांपासून तो आता 10 शतकं दूर आहे.

अवश्य वाचा – पृथ्वी शॉचे पुनरागमनाचे संकेत, म्हणाला आयपीएलआधी फिट होईन !

“माझ्या मते सध्याच्या घडीला विराट कोहली सर्वोत्तम फलंदाज आहे. तो सचिनचे सर्व विक्रम मोडीत काढेल. फक्त विराटच नाही किंबहुना रोहित, शिखर धवन यांच्यासारखे अनेक चांगले फलंदाज भारतीय संघात आहेत. तुम्ही वन-डे क्रिकेटमध्ये रोहित शर्माची फलंदाजी पाहणं हे एक वेगळं सुख आहे. मात्र या सर्व गोष्टी एकदम येत नाहीत. यासाठी मेहनतीची गरज असते. विराट कोहली आणि भारतीय संघाने ती मेहनत गेल्या वर्षभरात घेतली असल्यामुळेच ते सध्या सर्वोच्च स्थानी आहे.” अब्बास विराट कोहली आणि भारतीय संघाचं कौतुक करत होते.

अवश्य वाचा – विराटसाठी रणनीती आखताना, रोहित-शिखरला विसरु नका !

फलंदाजांसोबत अब्बास यांनी भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीचंही कौतुक केलं आहे. गेल्या काही वर्षात भारतीय गोलंदाजांनी MRF अकादमीच्या माध्यमातून स्वतःत चांगला बदल केला आहे. विशेषकरुन आयपीएलच्या येण्यामुळे भारतीय संघाच्या कामगिरीत फरक पडला आहे. सध्याच्या घडीला भारतीय संघ जागतिक क्रिकेटमध्ये सर्वोत्तम आहे. ऑस्ट्रेलियावर मात केल्यानंतर भारत मंगळवारपासून न्यूझीलंडशी 5 सामन्यांची वन-डे मालिका खेळणार आहे.

अवश्य वाचा – धोनीला एकटं सोडलं नाहीस हे चांगलं केलंस, सौरव गांगुलीकडून विराटचं कौतुक