पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाला अजिंक्य रहाणेने आपल्या नेतृत्वाच्या बळावर विजयपथावर आणलं. आपल्या नेतृत्व गुणांची चुणूक दाखवत रहाणेनं बॉर्डर-गावसकर मालिकेतील भारताचं आवाहन कायम राखलं. त्यानंतर सर्वच स्तरातून अजिंक्यवर कौतुकाचा वर्षाव झाला. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत आजपासून सुरु झालेली तिसरी कसोटी निर्णयक ठरणार आहे. त्यामुळे अजिंक्यच्या नेतृत्व गुणांची कसोटी पुढील दोन सामन्यांमध्येही लागणार आहे. असं असतानाच रवी शास्त्री यांनी मात्र पुन्हा एकदा विराटच आपली पहिली पसंती असल्याचं अप्रत्यक्ष सांगितलं आहे. क्रिकेट डॉट कॉम डॉट एयू च्या रिपोर्ट्सनुसार रवी शास्त्री यांनी बुधवारी सिडनी क्रिकेट मैदानावर मागील ७१ वर्षात भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या कसोटी मालिकेवर एक पुस्तक लॉन्च केलं आहे. यावेळी बलोताना रवी शास्त्री यांनी विराट कोहलीच्या नेतृत्वाचे गोडवे गायले आहेत.

यावेळी रवी शास्त्री म्हणाले की, ऑस्ट्रेलियाच्या संघाला त्यांच्यात मायदेशात आणि ऑस्ट्रेलियाबाहेर पराभूत करण्याची किमया विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघानं केली आहे. विराट कोहलीसारखा पराक्रम इतर दुसऱ्या कर्णधाराला करता येणं कठीण आहे. ही एक ऐतिहासिक कामगिरी आहे. विराट कोहलीनं ७१ वर्षांनंतर भारताला ऑस्ट्रेलियात मालिका विजय मिळवून दिला. २०१८-१९ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाचा २-१ ने पराभव केला होता. यावेळी रवी शास्त्री भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. त्याआधी २०१६-१७ मध्ये भारतामध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. यावेळी अनिल कुंबळे भारतीय संघाचे प्रशिक्षक होते.

आणखी वाचा- अजिंक्यच्या नेतृत्वात ‘या’ १० खेळाडूंनी केले पदार्पण; नावं जाणून व्हाल चकीत

तब्बल ७१ वर्ष भारतीय संघ ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, ते शक्य होत नव्हतं. पण विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघानं ही किमया साधली. मोठ्या कालावधीपर्यंत दुसऱ्या कर्णधाराला अशी ऐतिहासिक कामगिरी करता येणं कठीण असल्याचं दिसतेय, असे शास्त्री म्हणाले.