आठवडय़ाची मुलाखत : देवेंद्र झाझरिया, दिव्यांग आंतरराष्ट्रीय भालाफेकपटू

‘‘न्याय मिळायला १२ वष्रे लागली. २००४मध्ये मी अ‍ॅथेन्स पॅरालिम्पिक स्पध्रेत विश्वविक्रमासह सुवर्णपदक जिंकले होते. त्यावेळी खेलरत्न पुरस्कार मिळाला असता, तर दिव्यांग खेळाडूंना मोठी प्रेरणा मिळाली असती. एक तप मी खेळासाठी समर्पित केले आणि त्याचे फळ २०१७मध्ये मिळताना दिसत आहे. इतक्या वर्षांच्या संघर्षांनंतर आमच्या ‘मन की बात’ जाणली जात आहे,’’ असे पॅरालिम्पिक स्पध्रेतील दोन सुवर्णपदके जिंकणाऱ्या भालाफेकपटू देवेंद्र झाझरियाने सांगितले.

jitendra awad challenge to ajit pawar
“अजित पवारांच्या डोक्यातलं विष बाहेर आलं”, ‘द्रौपदी’वरच्या विधानावरुन जितेंद्र आव्हाडांची टीका
chhagan bhujbal sharad pawar l
“शरद पवारांनी २०१४ च्या निवडणुकीवेळी…”, पटेलांच्या ‘त्या’ दाव्यानंतर भुजबळांचा आणखी एक गौप्यस्फोट
Devendra Fadnavis On Praful Patel Statement
“शरद पवार भाजपाबरोबर येण्यास ५० टक्के अनुकूल होते”; प्रफुल्ल पटेलांच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, “हे सत्य…”
Wardha Lok Sabha
राष्ट्रवादी २५ वर्षांनंतर पुन्हा वर्ध्याच्या रिंगणात

२०१७च्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी झाझरियाच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. ही शिफारस म्हणजे इतक्या वर्षांच्या मेहनतीचे फळ असल्याची प्रतिक्रिया त्याने ‘लोकसत्ता’ला दिली. २००४च्या अ‍ॅथेन्स पॅरालिम्पिक स्पध्रेत झाझरियाने ६२.१५ मीटर भालाफेक करून विश्वविक्रमाची नोंद केली आणि सुवर्णपदकही जिंकले. २०१६च्या रिओ पॅरालिम्पिक स्पध्रेत त्याने स्वत:च्या नावावर असलेला विश्वविक्रम मोडत ६३.९७ मीटरसह सुवर्णपदक पटकावले आहे.

  • २०१२मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि आता पाच वर्षांनी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस झाली. या क्षणाचे महत्त्व कसे विशद करशील?

राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी माझ्या नावाची शिफारस झाल्याचा आनंद आहे. या पुरस्कारासाठी शिफारस होणारा मी पहिला दिव्यांग खेळाडू आहे. २०१२मध्ये जेव्हा मला पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता, तेव्हाही तो स्वीकारणारा मी पहिला दिव्यांग खेळाडू होतो. त्यामुळे खेलरत्नसाठीची शिफारस हा केवळ माझाच नाही तर देशातील सर्व दिव्यांग खेळाडूंचा सन्मान आहे. या पुढाकारामुळे इतर दिव्यांग खेळाडूंनाही नक्की प्ररेणा मिळेल.

  • अ‍ॅथेन्स पॅरालिम्पिकमध्ये तुम्ही विश्वविक्रमासह सुवर्णपदक जिंकले होते. त्यावेळी खेलरत्न पुरस्कार मिळाला असता, तर दिव्यांग खेळाडूंचे चित्र अधिक चांगले असते?

हो, नक्कीच. २००४मध्ये मी अ‍ॅथेन्स पॅरालिम्पिक स्पध्रेत विश्वविक्रमासह सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर म्हणजेच २००५मध्ये मला खेलरत्न मिळाले असते, तर मी अधिक आनंदी झालो असतो. १२ वर्षांनंतर या पुरस्कारासाठी माझी शिफारस होत आहे. २००५मध्ये असे काही घडले असते, तर या कालखंडात अजून विक्रमी कामगिरी करणारे दिव्यांग खेळाडू मिळाले असते. या खेळांतही बरीच सुधारणा झाली असती.

  • अजूनही दिव्यांग खेळाडू आणि सर्वसाधारण खेळाडू यांच्यात भेदभाव होत आहे का?

हे चित्र बदलत आहे. गेल्या तीन वर्षांत आमच्या खेळांमध्ये झालेली सुधारणा उल्लेखनीय आहे. मैदाने असतील किंवा दिव्यांग खेळाडूंसाठीच्या इतर सुविधा असतील, केंद्र सरकार त्याकडे जातीने लक्ष देत आहे. त्याचे सकारात्मक निकाल आपल्याला रिओ पॅरालिम्पिक स्पध्रेत पाहायला मिळाले. भारताने पहिल्यांदा पॅरालिम्पिक स्पध्रेत चार पदकांची कमाई केली. त्यात दोन सुवर्ण आणि प्रत्येकी एक-एक रौप्य व कांस्यपदकही होते. सरकारच्या ‘टॉप’ योजनेत माझा समावेश करण्यात आला, आम्हाला वैयक्तिक प्रशिक्षक आणि सोयी-सुविधा मिळत आहेत. त्यामुळे आता दिव्यांग खेळाडूंना चांगले दिवस आले आहेत. पूर्वी आम्हाला फार संघर्ष करावा लागला आणि हा त्याचाच विजय आहे. आता कुठे आमच्या भावना समजून घेतल्या जात आहेत. रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेतील यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या ‘मन की बात’मधून दिव्यांग खेळाडूंचे अभिनंदन केले होते.

  • या प्रेरणादायी वाटचालीनंतर दिव्यांग खेळाडूंना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता?

दिव्यांग किंवा सर्वसाधारण खेळाडूंना मी एकच सांगू इच्छितो की, आयुष्यात कधी पराभव मानू नका. देवेंद्र झाझरियाने पराभव मानला असता, परिस्थितीसमोर शरणागती पत्करली असती, तर आज त्याचे नाव कुठेच नसते. एक ग्रामीण भागातील खेळाडू विश्वविक्रमवीर झाला. हे मला जमले, तर तुम्हालाही जमू शकते!