३ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी नुकतीच संघाची घोषणा करण्यात आली. विश्वचषकात भारतीय संघाचं उपांत्य फेरीत आव्हान संपुष्टात आल्यानंतर, विंडीज दौऱ्यात नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. भारत अ संघाकडून अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या कृणाल पांड्याला या दौऱ्यात टी-२० संघामध्ये जागा मिळाली आहे. bcci.tv ला दिलेल्या मुलाखतीत कृणालने संघातील निवडीबद्दल आपली प्रतिक्रीया दिली आहे.

“भारत अ संघाकडून खेळण्याचा अनुभव हा माझ्यासाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये मी इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज या देशांमध्ये अ संघाकडून खेळलो आहे. त्यामुळे प्रत्येक सामन्यात तुम्हाला खेळपट्टी आणि वातावरणाचा अंदाज येतो. या गोष्टी सिनीअर संघात खूप कामी येतात.” कृणालने आपल्या विंडीज दौऱ्यातील अनुभव सांगितला.

यावेळी बोलत असताना, कृणालने कर्णधार विराट कोहली आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या असल्याचं म्हटलं आहे. “प्रत्येक सामन्यात विराटची धावांची भूक वाढत असते. तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये तो सध्या आक्रमक क्रिकेट खेळतोय. त्याच्याकडून ही गोष्ट शिकायला मला आवडेल”, कृणाल बोलत होता.

अवश्य वाचा – विराट आणि रोहितमध्ये वितुष्ट? गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण म्हणतात….

याचसोबत कृणालने महेंद्रसिंह धोनीच्या संयमाचंही कौतुक केलं. आजही धोनी हा भारताचा सर्वोत्तम फिनीशर खेळाडू आहे. खडतर परिस्थितीतही तो संयमाने खेळतो, सामन्याचं पारडं कोणत्या दिशेने झुकलं आहे, हे पाहून तो खेळ करत असतो. धोनीचा हा संयम मलाही शिकायचा असल्याचं पांड्याने कबूल केलं.

विंडीजविरुद्ध टी-२० मालिकेसाठी असा असेल भारताचा संघ –

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जाडेजा, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, भुवनेश्वर कुमार, खलिल अहमद, दिपक चहर, नवदिप सैनी

अवश्य वाचा – संघात निवड करायची की नाही, तुम्हीच ठरवा ! धोनीकडून चेंडू निवड समितीच्या कोर्टात