विजयासाठी १९४ धावांचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाला इंग्लंडने १६२ धावांत गुंडाळून एजबॅस्टन कसोटीत ३१ धावांनी विजय साजरा केला. या विजयासह कसोटी मालिकेत इंग्लंडने १-०ने आघाडी मिळवली आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात इंग्लंडचा हा एक हजारावा कसोटी सामना होता. त्यामुळे हा विजय साहेबांसाठी अविस्मरणीय ठरला. या सामन्यात भारताला निसटत्या परावाला सामोर जावे लागले. गोलंदाजांनी चोख कामगिरी बजावल्यानंतर विराट वगळता अन्य फलंदाजांनी निराशा केली.

सामन्यानंतर बोलताना विराट कोहलीने इशांत शर्मा आणि उमेश यादव यांची स्तुती केली. यावेळी विराट कोहलीने पराभ मान्य करतानाच आपली चूकही कबूल केली. तो म्हणाला की फलंदाजांनी मैदानावर कसे टिकून रहायचे ते इशांत -उमेश यांच्याकडून शिकायला हवे. यासामन्यात झालेल्या चुका आम्ही पुढील सामन्यात होऊ देणार नाही. झालेल्या चुकापासून बोध घेत त्या पुढे होणार नाहीत याची काळजी घेऊ. मधल्या फळीतील फलंदाजांनी मैदानावर थांबायला हवे होते. छोट्या छोट्या भागिदारी झाल्या असत्या तरी विजय मिळवता आला असता.

हरलो पण लढल्याचा अभिमान – कोहली

सामन्यानंतर बोलताना विराट कोहली म्हणाला की सामना एकतर्फी न होता रंगतदार झाला याचा आनंद आहे. आम्ही आमचे १०० टक्के दिले. पण इंग्लंडची कामगिरी आमच्यापेक्षा सरस ठरल्यामुळे आमचा पराभव झाला. आम्ही हरले असलो तरी त्याचे शल्य मनात नाही त्याउलट लढल्याचा अभिमान असल्याचे विराट कोहली म्हणाला. फलंदाज आणखी चांगली कामगिरी करु शकले असते पण ते धावा जमवण्यात अपयशी ठरल्याची कबुलीही यावेळी विराट कोहलीने दिली. पुढे बोलताना तो म्हणाला की, आमचा पराभव झाला असला तरी लढा दिल्याचा आनंद आहे. त्याबरोबरच पुढील कसोटी सामन्यात चांगली कामगिरी करू असा विश्वास यावेळी व्यक्त केला.

पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने १४९ आणि ५१ धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त एकाही भारतीय फलंदाजाला आपल्या लौकीकास साजेशी खेळी करता आली नाही. भारताकडून इशांत शर्मा आणि अश्निनने गोलंदाजीत मोलाचे योगदान दिले.