धनकर, कडियनला पराभवाचा धक्का

जागतिक कुस्ती स्पर्धा

सुमित मलिक याला टोक्यो ऑलिम्पिकचे स्थान मिळवण्यासाठी एका विजयाची आवश्यकता आहे. मात्र सत्यवर्त कडियन आणि अमित धनकरला यांचे जागतिक कुस्ती या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेतील आव्हान गुरुवारी संपुष्टात आले.

१२५ किलो गटात सलामीच्या लढतीत मलिकने किर्गिझिस्तानच्या आयाल लाझारेव्हविरुद्ध २-२ अशा परिस्थितीनंतरही सरशी साधली. अखेरच्या क्षणी लाझारेव्हला रिंगणाच्या बाहेर ढकलत मलिकने ही लढत जिंकली. त्यानंतर मोल्डोवाच्या अलेक्झांडर रोमानोव्हविरुद्ध झालेल्या लढतीत मलिकने ३-२ अशी बाजी मारली.

उपांत्यपूर्व लढतीत मलिकने ताजिकिस्तानच्या रुस्तम इस्कंदरी याला ६-४ असे पराभूत केले. आता ऑलिम्पिक पात्रतेसाठी मलिकला व्हेनेझुएलाच्या जोस डॅनियल डियाझ रॉबेर्टीचा अडथळा पार करावा लागेल.

पात्रता लढतीत धानकरला मोल्डोवाच्या मिहाइल सावा याने ६-९ असे पराभूत केले. कडियान याने उपउपांत्यपूर्व लढतीत प्यूएटरे रिकोच्या इव्हान अमाडोर रामोस याचे आव्हान ५-२ असे परतवून लावले. उपांत्यपूर्व फेरीत त्याने बल्गेरियाच्या अहमद सुल्तानोव्हिच बाताएव्हविरुद्ध ५-१ अशी आघाडी घेतलो होती. मात्र अखेरच्या २० सेकंदांत चार गुण गमवावे लागल्याने त्याला या लढतीवर पाणी फेरावे लागले.

दुसऱ्या फेरीत सलग पाच गुण मिळवत कडियनने आघाडी घेतली होती. सामना संपायला अवघी काही सेकंद शिल्लक असताना बाताएव्हने कडियनला दोन वेळा जमिनीवर झोपवत चार गुण वसूल केले आणि कडियनच्या ऑलिम्पिक पात्रतेच्या आशा संपुष्टात आणल्या.

सुमित मलिक