भारतीय संघातील खेळाडूंनी आयपीएलच्या कोशातून बाहेर पडावे अशी उपहासात्मक टीका इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने केली आहे. इंग्लंडमध्ये चेंडू स्विंग होणाऱ्या खेळपट्टय़ांना सरावण्यासाठी त्यांनी काऊंटी क्रिकेट खेळणे आवश्यक आहे, असे त्याने पुढे सांगितले.
डेली टेलिग्राफसाठी लिहिलेल्या स्तंभात तो पुढे म्हणतो, ‘बीसीसीआयने काही कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. केवळ आयपीएलचा विचार करणे योग्य नाही. आयपीएलच्या माध्यमातून खेळाडूंना पैसा मिळत असेल मात्र खेळाडू म्हणून त्यांच्यात सुधारणा होण्यासाठी त्यांनी इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळणे गरजेचे आहे. गेल्या २५-३० वर्षांतील महान खेळाडू काऊंटी क्रिकेटचा भाग होते. सर्वसमावेशक खेळासाठी ते आवश्यक आहे.’
भारतीय संघाच्या दारुण पराभवानंतर वॉनने आपल्या ट्विटर हँडलवर पांढरा झेंडा टाकला होता. हा भारतीय क्रिकेट संघाचा नवीन झेंडा असल्याचे त्याने म्हटले आहे.