सनरायझर्स हैदराबादचा ऑस्ट्रेलियन अष्टपैलू क्रिकेटपटू मिशेल मार्शने आयपीएलच्या यंदाच्या हंगामातून माघार घेतली आहे. क्रिकबझच्या अहवालानुसार मार्शला बायो बबलमध्ये जास्त काळ राहायचे नव्हते. काही दिवसांपूर्वी त्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) आणि हैदराबादला आपला निर्णय सांगितला होता.

 

मार्शच्या जागी रॉय

हैदराबाद संघाने मार्शच्या जागी इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज जेसन रॉयला आपल्या ताफ्यात सामील केले आहे. झटपट क्रिकेटमध्ये स्फोटक फलंदाजी करणाऱ्या रॉयने नुकत्याच संपलेल्या भारताविरुद्धच्या टी-20 आणि वनडे मालिकेत संघाचे प्रतिनिधित्व केले होते. विशेष म्हणजे, आयपीएल लिलावात रॉयला संघात घेण्यात कोणीच स्वारस्य दाखवले नव्हते. रॉय 2017मध्ये गुजरात लायन्स आणि 2018मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाकडून खेळला आहे. या दोन हंगामात रॉयने 8 डावात 179 धावा फटकावल्या आहेत.

 

आयपीएलच्या बायो सिक्योरिटी प्रोटोकॉलनुसार मार्शला सात दिवस क्वारंटाइन राहण्याची गरज होती. हैदराबाद संघाने 2020च्या लिलावात मार्शला 2 कोटी रुपयांची बोली लावत संघात घेतले. परंतु मागील हंगामातही तो दुखापतीमुळे जास्त काळ बाहेर होता. मागील हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात मार्शच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे तो उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडला. विंडीजचा अष्टपैलू क्रिकेटपटू जेसन होल्डरला मार्शचा पर्यायी खेळाडू म्हणून संघात स्थान दिले गेले.

या दुखापतीतून सावरल्यानंतर मार्शला न्यूझीलंडविरुद्ध अलिकडे खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलिया संघात स्थान देण्यात आले. बिग बॅश लीगमध्ये तो पर्थ स्कॉर्चर्सकडूनही खेळला होता. गेल्या दहा वर्षात मार्शने 21 आयपीएल सामने खेळले आहेत. तो या स्पर्धेत डेक्कन चार्जर्स आणि पुणे वॉरियर्स संघातून खेळला आहे.