कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला दिलासा मिळाला आहे. शमीविरोधात जारी करण्यात आलेल्या अटक वॉरंटला पश्चिम बंगालमधील अलीपूर जिल्हा न्यायलयाने स्थगिती दिली आहे. शमीचे वकील सलीम रहमान यांनी ही माहिती दिली. या प्रकरणाची पुढील सुनावणी २ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

गेल्या आठवड्यात शमी आणि त्याचा भाऊ हासिद अहमदविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले होते. वेस्ट इंडीज दौरा संपल्यानंतर शमी अमेरिकेला गेला आहे. तो बीसीसीआयबरोबरच वकिलाच्याही संपर्कात आहे.

जोपर्यंत चार्जशीट दाखल होत नाही, तोपर्यंत शमीविरोधात कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. बीसीसीआयमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले की, शमी १२ सप्टेंबरला भारतात परतेल. सध्या तो आपले वकील सलीम रहमान यांच्याशी संपर्कात आहे.

काय आहे मोहम्मद शमी-हसीन जहाँ वाद ?

अनेक तरुणींशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप मोहम्मद शमीच्या पत्नीनं फेसबुकवरून केल्यानं गेल्यावर्षी एकच खळबळ उडाली. शमीची पत्नी हसीन जहाँने फेसबुकवर शमीच्या काही अश्लील चॅट्स आणि काही मुलींचे फोटोही अपलोड केलं होते. यामुळे भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. नागपूर, कोलकाता, कराची, काश्मीर आणि बेंगळुरुतील तरुणीचे शमीशी संबंध आहेत, असा आरोप त्याच्या पत्नीनं फेसबुक पोस्टद्वारे केला होता. हसीन जहाँने केलेल्या आरोपांनंतर या दोघांचाही वाद चव्हाट्यावर आला. मोहम्मद शमी, त्याचा भाऊ, त्याची आई  हे आपला छळ करत असल्याचाही आरोपही हसीन जहाँने केला होता. पैशांसाठी आपल्याला उपाशी ठेवले गेले, माझा मानसिक आणि शारिरीक छळ केला असाही आरोप हसीन जहाँने केला होता.